Join us

राज्यात व राज्याबाहेर ३० हजारांहून अधिक मुलांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:06 AM

कोरोना काळात आर्थिक परिस्थिती बिघडल्याने संख्या मोठीसीमा महांगडेमुंबई : कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वर्षात अनेक पालकांनी आपल्या ...

कोरोना काळात आर्थिक परिस्थिती बिघडल्याने संख्या मोठी

सीमा महांगडे

मुंबई : कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वर्षात अनेक पालकांनी आपल्या मुलांसह राज्याबाहेर, तालुक्याबाहेर, गाव, जिल्ह्याबाहेर स्थलांतर केले असून अनेक मुले पालकांसह परराज्यांतून महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती राज्याच्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणावरून समोर आली. राज्यातून स्थलांतरित झालेल्या मुलांची एकूण संख्या ३३ हजार ३७० असून त्यामध्ये १७ हजार ६४४ मुलांचा आणि १५ हजार ७२६ मुलींचा समावेश आहे. याचप्रमाणे या काळात बाहेरील राज्यांतूनही महाराष्ट्रात ३३ हजार ५९० मुलांनी पालकांसह स्थलांतर केले असून यामध्ये मुलांची संख्या १८ हजार १३०, तर मुलींची संख्या १५ हजार ४३० असल्याचे वास्तव राज्य शासनाने केलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणावरून समोर आले. यंदा कोरोना काळातील आर्थिक परिस्थिती अधिक बिकट झाल्याने स्थलांतरित कुटुंबाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने १ ते १० मार्च २०२१ राबविलेल्या शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेतून ६ ते १४ वयोगटांतील २५ हजार २०४ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. त्यापैकी ७ हजार ८०६ मुले कधीच शाळेत गेलेली नाहीत, तर १७ हजार ३९७ मुले अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झाल्याचे अहवालात नमूद असून तीन जिल्हे, दोन महापालिका क्षेत्रात ही मोहीम राबवली नसल्याचे अहवालात म्हटले आहे. राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांतून कुटुंबे स्थलांतर करत असून ही कुटुंबे, महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या जवळच्या राज्यात स्थलांतर करतात. ऊसतोडणी, वीटभट्टी, दगडखाण, कोळसा खाणी, शेतमजुरी, बांधकाम व्यवसाय, सार्वजनिक बांधकाम विभागातील कामे करण्यासाठी ही कुटुंबे स्थलांतर करत असतात, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे राजेश क्षीरसागर यांनी दिली.

कोट

ही आकडेवारी म्हणजे शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नांची क्रूर थट्टा असून मूळ आकडेवारी याच्या कितीतरी पट अधिक भरेल. बालकामगार, रस्त्यावरील मुले, वेश्यांची मुले, बालविवाह झालेल्या मुली ही वेगवेगळी संख्या एकत्र केली तर काही लाखांत भरेल. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वेक्षण करावे, अशी स्वयंसेवी संस्थांची मागणी आहे.

- हेरंब कुलकर्णी , शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते.

चौकट

शाळेत प्रवेश न घेतलेली ६ ते १४ वयोगटांतील मुले - ७,८०६

अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य मुले - १७,३९७

एकूण शाळाबाह्य मुले - २५,२०४

बाल कामगार असलेली शाळाबाह्य मुले - २८८

अन्य कारणांनी शाळाबाह्य मुले - २३,७०४

-------

स्थलांतरित मुलांची आकडेवारी

-राज्याबाहेर स्थलांतरित झालेली एकूण मुले - ३३ हजार ३७०

१) महाराष्ट्राबाहेर - १४०८४

२) जिल्ह्याबाहेर - ११९७२

३) गाव/ तालुक्याबाहेर -७३१४

परराज्यांतून राज्यात आलेली - ३३५९०

१) दुसऱ्या राज्यातून आलेली -७७८४

२) जिल्ह्यातून आलेली -१६८६५

३) दुसऱ्या गाव/ तालुक्यातून आलेली - ८९४१

.........................