सिद्धार्थ रुग्णालयातील विभागांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:29 AM2019-06-08T01:29:16+5:302019-06-08T01:29:30+5:30
पर्यायी व्यवस्था होईपर्यंत रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय सेवाही याच रुग्णालयाच्या अपघात विभागात २४ तास सुरू आहे. शिवाय सर्वसाधारण बाह्यरुग्णविभाग पहिल्या मजल्यावर सुरू ठेवण्यात आला आहे
मुंबई : गोरेगाव पश्चिम परिसरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ रुग्णालयातील विभाग महापालिकेच्याच इतर रुग्णालयांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात येणार आहेत. रुग्णालय इमारतीच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्याव्यतिरिक्तच्या १८ महिन्यांत पूर्ण झाल्यानंतर रुग्णालय आहे त्याच जागी सुरू होणार आहे.
पर्यायी व्यवस्था होईपर्यंत रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय सेवाही याच रुग्णालयाच्या अपघात विभागात २४ तास सुरू आहे. शिवाय सर्वसाधारण बाह्यरुग्णविभाग पहिल्या मजल्यावर सुरू ठेवण्यात आला आहे. दरम्यान, रुग्णालयांच्या इमारतींची पाहणी करण्यात येते. पाहणीदरम्यान इमारतीच्या स्तंभांना तडे गेल्याचे आढळले. परिणामी, परीक्षण अहवालानुसार इमारत रिकामी करून तिची दुरुस्ती कामे करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने विविध विभाग तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात येत आहेत.
असे केले जाणार रुग्णालयातील विभागांचे स्थलांतर
१) अतिदक्षता विभाग, ए. आर. टी. सेंटर (बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, जोगेश्वरी पू.)
२) शल्यचिकित्सा विभाग, अस्थिव्यंग विभाग, कान-नाक-घसा विभाग, नेत्रचिकित्सा विभाग, स्त्रीरोग चिकित्सा विभाग, मनोविकार चिकित्सा विभाग, आपत्कालीन वैद्यकीय सेवा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली प.)
३) वैद्यकीय चिकित्सा विभाग, बालरोग चिकित्सा विभाग, त्वचारोग चिकित्सा विभाग, दंतचिकित्सा विभाग (भगवती रुग्णालय, बोरीवली प.)