प्रदूषणासह पर्यटकांमुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या जीवाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 02:36 AM2021-04-09T02:36:49+5:302021-04-09T02:36:56+5:30
सर्वेक्षणातील निष्कर्ष; ७० प्रजातींची नोंद
मुंबई : मध्य आशियातील उड्डाणमार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थलांतरित पाणपक्ष्यांची गतिशीलता, हालचालींचे नमुने, स्थलांतरित मार्ग, त्यांनी जमीन आणि किनारपट्टीवरील ओलांडलेल्या प्रदेशाद्वारे, लांब पल्ले अशा अनेक घटकांचा अभ्यास केल्यानंतर स्थलांतरित पक्ष्यांच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जून २०१७ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणाअंती हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
किनारपट्टीवरील ओलसर जमीन ही या स्थलांतरित पाणपक्ष्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. ही किनारपट्टी स्थलांतरित झालेल्या हिवाळ्यातील पाणपक्ष्यांसाठी किती महत्त्वाची आहे हे समजून घेण्यासाठी कोकण किनारपट्टीवरील अलिबाग, तेरेखोल येथील ओलसर जागांचा अभ्यास करण्यात आला. सर्वेक्षणादरम्यान ७० प्रजातींच्या पाणपक्ष्यांची नोंद झाली.
‘बर्ड बँड’च्या नाेंदीसाठी मोबाइल ॲप्लिकेशन
बर्ड बँड पक्ष्यांची नोंद ठेवण्यासाठी व त्यांच्या हालचाली, आरोग्य, परिसर तसेच निवासस्थानाची स्थिती याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी, पक्षी दर्शविणारा अर्ज तयार करण्यात आला आहे. शिवाय जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मॅन्ग्रोव्ह फाउंडेशनने ‘बर्ड बँड’ नावाचे एक मोबाइल ॲप्लिकेशनही अधिकृतपणे लाँच केले.
पाणपक्ष्यांना हा आहे त्रास
प्लास्टिक आणि घनकचरा प्रदूषण, भटक्या कुत्र्यांचे हल्ले, पर्यटकांमुळे अडचणींचा हाेणारा वावर, प्रकल्प, पाणथळ जमिनीवरील मासेमारी इत्यादी
या पक्ष्यांना आहे धोका
ग्रेट नॉट, आशियान वूलीनेक, इंडियन स्किमर, ब्लॅक टेल्ड गॉडविट, कार्ल्यू सॅण्डपायपर, ब्लॅक हेडेड आयबीस, युरेशिअन कार्ल्यू, युरेशिअन ऑईस्टरकॅचर, लेसर फ्लेमिंगो