नवे घर नवी मुंबई, ठाण्यात; नागरीकरणामुळे पाणथळ जागा बुजल्या
८ मे : जागतिक स्थलांतरित पक्षी दिन
सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले प्रकल्प, निर्माणधिन इमारती, वाढते प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे स्थलांतरित पक्षी येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नागरीकरणामुळे पाणथळ जागा बुजवल्याने त्याचा फटका पक्ष्यांना बसत आहे. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांनी मुंबईकडे पाठ फिरवली असून, नवी मुंबई, ठाण्याकडे माेर्चा वळवला आहे.
कडाक्याच्या थंडीपासून जीव वाचविण्यासह अन्नाच्या शोधात स्थलांतरित पक्षी हिमालय ओलांडून भारतात दाखल होतात. येथे दाखल झालेल्या स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम सहा महिने असतो. भारतात स्थलांतरित होणाऱ्या सुमारे २३० तर महाराष्ट्रात ६०च्या आसपास प्रजाती आहेत. जेथे जास्त पाणी तेथे अन्नाची उपलब्धता जास्त असते, अशाठिकाणी पक्षी स्थलांतर करतात. दरम्यान, ३० वर्षांत मुंबईत असलेले ४२ टक्के जंगल नष्ट झाले आहे. ४० वर्षांत मुंबईतील हिरवळ सुमारे ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे आता स्थालांतरित पक्षी मुंबईऐवजी नवी मुंबई, ठाण्यात पाहायला मिळत आहेत.
* अधिवासात हस्तक्षेप नकाे
स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास आता बदलत आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी स्थलांतरित पक्षी शिवडी खाडी आणि माहीम येथे तसेच बीकेसी आणि जेथे पाणथळ जागा आहेत तेथे मोठ्या प्रमाणावर येत होते. यामध्ये फ्लेमिंगोसारख्या पक्ष्यांचा समावेश आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पक्ष्यांच्या अधिवासालगत मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे. शिवाय मानवी हस्तक्षेपही वाढला आहे. याचा फटका पक्ष्यांना बसत आहे. त्यामुळे बहुतांश स्थलांतरित पक्षी आता मुंबईऐवजी ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मोठ्या संख्येने आढळत आहेत. यावर उपाय म्हणजे सरकार असो किंवा सर्वसामान्य नागरिक, त्यांनी पक्ष्यांच्या अधिवासात हस्तक्षेप करता कामा नये.
- धर्मेश बरई, पर्यावरणप्रेमी
* प्रदूषणाचा फटका
शिकारी पक्ष्यांचे आक्रमण होऊ शकते. नागरीकरणामुळे पाणथळ जागा बुजवल्याने त्याचा फटका त्यांना बसतो. येथील तलाव, नद्या, पाणथळ जागा प्रदूषित झाल्याने या पक्ष्यांना अन्न मिळत नाही. हिमालय पर्वत ओलांडताना पक्ष्यांना ऊर्जा लागते. याचवेळी मान्सून आणि वाऱ्यालाही तोंड द्यावे लागते. यात त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. छोटे पक्षी उंचावर जाऊ शकत नाहीत, त्यावेळी हिमालयाच्या दऱ्यातून ते प्रवास करतात, तेव्हा थांब्यादरम्यान स्थानिकांकडून त्यांची शिकार होते.
* शहरात केवळ १३ टक्के हिरवळ
आता शहरात केवळ १३ टक्के हिरवळ आहे. ३० वर्षांत मुंबईत असलेले ४२ टक्के जंगल नष्ट झाले आहे. ४० वर्षांत मुंबईतील हिरवळ सुमारे ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. एकूण ८८ प्रभागांपैकी ६८ प्रभागांतील हिरवळ गेल्या २० वर्षांत कमी झाली आहे. सर्वाधिक फटका गोरेगावला बसला आहे. अंधेरी पश्चिम व मालाड भागांतील हिरवळ कमी झाली आहे. २००१मध्ये ६२.५ टक्के भागात हिरवळ असलेल्या गोरेगावमध्ये २०११मध्ये केवळ १७ टक्के हिरवळ उरली आहे. अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले, सायन, परळ, दादर, चेंबूर, घाटकोपर, कुर्ला व पवई या परिसरात हिरवळीची कमतरता आहे.
---------------