प्रदूषणामुळे स्थलांतरित पक्ष्यांनी मुंबईकडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 06:19 AM2021-05-08T06:19:55+5:302021-05-08T06:20:29+5:30

नवे घर नवी मुंबई, ठाण्यात; नागरीकरणामुळे पाणथळ जागा बुजल्या

Migratory birds turn their backs on Mumbai due to pollution | प्रदूषणामुळे स्थलांतरित पक्ष्यांनी मुंबईकडे फिरवली पाठ

प्रदूषणामुळे स्थलांतरित पक्ष्यांनी मुंबईकडे फिरवली पाठ

googlenewsNext

सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले प्रकल्प, निर्माणधिन इमारती, वाढते प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे स्थलांतरित पक्षी येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नागरीकरणामुळे पाणथळ जागा बुजवल्याने त्याचा फटका पक्ष्यांना बसत आहे. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांनी मुंबईकडे पाठ फिरवली असून, नवी मुंबई, ठाण्याकडे माेर्चा वळवला आहे.

कडाक्याच्या थंडीपासून जीव वाचविण्यासह अन्नाच्या शोधात स्थलांतरित पक्षी हिमालय ओलांडून भारतात दाखल होतात. येथे दाखल झालेल्या स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम सहा महिने असतो. भारतात स्थलांतरित होणाऱ्या सुमारे २३० तर महाराष्ट्रात ६०च्या आसपास प्रजाती आहेत. जेथे जास्त पाणी तेथे अन्नाची उपलब्धता जास्त असते, अशाठिकाणी पक्षी स्थलांतर करतात. ३० वर्षांत मुंबईत असलेले ४२ टक्के जंगल नष्ट झाले. त्याचा फटका बसतो आहे.

प्रदूषणाचा फटका
येथील तलाव, नद्या, पाणथळ जागा प्रदूषित झाल्याने या पक्ष्यांना अन्न मिळत नाही. हिमालय पर्वत ओलांडताना पक्ष्यांना ऊर्जा लागते. याचवेळी मान्सून आणि वाऱ्यालाही तोंड द्यावे लागते. यात त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. छोटे पक्षी उंचावर जाऊ शकत नाहीत, त्यावेळी हिमालयाच्या दऱ्यातून ते प्रवास करतात, तेव्हा थांब्यादरम्यान स्थानिकांकडून त्यांची शिकार होते.

शहरात केवळ १३ टक्के हिरवळ
nआता शहरात केवळ १३ टक्के हिरवळ आहे. ४० वर्षांत मुंबईतील हिरवळ सुमारे ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. एकूण ८८ प्रभागांपैकी ६८ प्रभागांतील हिरवळ गेल्या २० वर्षांत कमी झाली आहे. 
nसर्वाधिक फटका गोरेगावला बसला आहे. २००१मध्ये ६२.५ टक्के भागात हिरवळ असलेल्या गोरेगावमध्ये २०११मध्ये केवळ १७ टक्के हिरवळ उरली आहे. अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले, सायन, परळ, दादर, चेंबूर, घाटकोपर, कुर्ला व पवई परिसरात हिरवळीची कमतरता आहे.

अधिवासात हस्तक्षेप नकाे
स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास आता बदलत आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी स्थलांतरित पक्षी शिवडी खाडी, माहीम तसेच बीकेसी व जेथे पाणथळ जागा आहेत तेथे मोठ्या प्रमाणावर येत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पक्ष्यांच्या अधिवासालगत मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे. मानवी हस्तक्षेपही वाढला आहे. याचा फटका पक्ष्यांना बसत आहे. त्यामुळे बहुतांश स्थलांतरित पक्षी आता मुंबईऐवजी ठाणे व नवी मुंबई परिसरात मोठ्या संख्येने आढळत आहेत. 
- धर्मेश बरई, पर्यावरणप्रेमी
 

Web Title: Migratory birds turn their backs on Mumbai due to pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.