अमेरिकेच्या मुंबईतील कॉन्सुल जनरलपदी हँकी; रविवारी स्वीकारला कार्यभार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 06:31 AM2022-08-09T06:31:51+5:302022-08-09T06:32:01+5:30
मुंबईतील कॉन्सुल जनरलपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी हॅंकी हे जॉर्डनची राजधानी असलेल्या अम्मान येथील अमेरिकी एम्बसी मिशनचे उप-मुख्य अधिकारी होते.
मुंबई : अमेरिकेच्या मुंबईतील कॉन्सुल जनरलपदाचा कार्यभार माईक हँकी यांनी रविवारी स्वीकारला. माजी कॉन्सुल जनरल डेव्हिड जे. रॅन्झ यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईतील कॉन्सुल जनरलपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी हॅंकी हे जॉर्डनची राजधानी असलेल्या अम्मान येथील अमेरिकी एम्बसी मिशनचे उप-मुख्य अधिकारी होते. तर, त्यापूर्वी अमेरिकी एम्बसीच्या जेरूसलेम येथील पॅलिस्टीनी अफेअर्स युनिटचे ते प्रमुख होते.
२००१ मध्ये राजनैतिक क्षेत्रात करिअरची सुरुवात केलेल्या हँकी यांनी सौदी अरेबिया, इजिप्त, इराक, येमेन आणि नायजेरिया येथेदेखील काम केलेले आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि दोन मुलेही भारतामध्ये आलेली आहेत. या नियुक्तीनंतर बोलताना हँकी म्हणाले की, ‘भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध दृढ होत असतानाच, पश्चिम भारतामध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणे हा सन्मान आहे. भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना, दोन्ही देश अधिक भरभराटीसाठी काम करतील. लोकशाही मूल्यांसाठी, आर्थिक भागीदारीसाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत’.