"लव्ह लेटर लिहिण्यापेक्षा..."; मिलिंद देवरांची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 05:26 PM2024-08-05T17:26:51+5:302024-08-05T17:30:00+5:30
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्ताना लिहिलेल्या पत्रावरुन माजी खासदार मिलिंद देवरा यांनी टीका केली आहे.
Milind Deora on Aditya Thackeray : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारच्या कारभारावरुन सातत्याने टीका करत आहेत. मुंबईतल्या विविध प्रश्नांवरुन आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला घेरलं आहे. कोस्टल रोडवरुन आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका मोकळ्या जागांवर होर्डिंग उभारणार असल्याचा मुद्दा उपस्थित करत पत्र लिहिलं होतं. यावरुनच शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरे यांनी एका एक्सपोस्टद्वारे महानगरपालिकेला एक पत्र लिहिले, ज्यात त्यांनी मुंबई कोस्टल रोडवर पोस्टर लावण्याच्या परवानगीला विरोध केला होता. होर्डिंगमुक्त एलिव्हेटेड रोडच्या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. आता शिंदे गटाच्या मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरेंना महापालिकेला बीएमसीला प्रेमपत्र लिहिण्याऐवजी वास्तविक मुद्द्यांवर बोलण्यास सांगितले.
आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिलं होतं. मुंबई महापालिकेने हाजी अली आणि अमरसन्स पार्क, ब्रीच कँडीजवळच्या कोस्टल रोड गार्डनच्या जागेवर असलेल्या मोकळ्या जागेवर होर्डिंग्ज उभारण्याची योजना आखली आहे. कोस्टल रोडलगत त्यासाठी चार पाच मोकळ्या जागा तयार करण्यात आल्या आहेत. या जागा नागरिकांसाठी खुल्या होण्याआधीच ठेकेदारांना दिल्या आहेत. याला आमचा विरोध आहे, तसंच होर्डिंग्जनाही आमचा विरोध असणार आहे. आमच्या मूळ ड्रीम प्रोजेक्टमध्ये होर्डिंगसाठी जागा नाही. यामुळे आमचा मुंबईकरांना हा शब्द आहे की यावर्षी आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही होर्डिंग्ज उतरवू आणि आमचे शहर उद्ध्वस्त करणाऱ्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना शिक्षा करु," असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं.
Aaditya,
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) August 5, 2024
Instead of writing love letters to the @mybmc Commissioner on random issues, present a real agenda for #Mumbai's development. Under CM @mieknathshinde Ji & DCM @Dev_Fadnavis Ji’s leadership, we've seen substantial infrastructure progress in Mumbai. While you stalled… https://t.co/8oUW7TJdlL
यानंतर आता मिलिंद देवरांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. "मुंबई मनपा आयुक्तांना अशा प्रकारची प्रेमपत्रं लिहिण्यापेक्षा मुंबईच्या विकासाचा खरा अजेंडा सादर करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये उल्लेखनीय प्रगती पाहिली आहे. तुम्ही मुंबई मेट्रोसारखे मोठे प्रकल्प रखडवले असताना, ते वेळेत पूर्ण करण्यासाठी महायुतीने अथक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या वरळीवर लक्ष केंद्रीत करा. त्या ठिकाणी मी शनिवारी तुमची अलोकप्रियता आम्हाला पाहण्यास मिळाली. या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत तुमच्या उमेदवार केवळ ६ हजार ५०० मतांनी आघाडीवर होता," असे मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे आता मिलिंद देवरा यांनी केलेल्या टीकेवर आदित्य ठाकरे कसा पलटवार करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.