मुंबई : मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना पदावरून दूर केल्यास त्यांच्या जागी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडचे सदस्य आणि माजी मंत्री मिलिंद देवरा यांची निवड करावी, असे पक्षातील विविध गटांनी एकत्रितरीत्या सुचविल्याने त्यांच्या नावावर पक्षाला निर्णय घ्यावा लागेल, असे नेत्यांचे म्हणणे आहे.पक्षाने निर्णय घेतल्यास देवरा यांच्या नेतृत्वाखाली सर्व नेते एकजुटीने निवडणुकांना सामोरे जातील, अशी ग्वाही नेत्यांनी प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांना दिली आहे. त्याचा विचार झाल्यास दोन दशकांहून अधिक काळ मुंबई विभागीय काँग्रेसवर एकहाती वर्चस्व निर्माण करणारे मुरली देवरा यांच्यानंतर त्यांच्या मुलाकडे हे पद जाईल आणि त्यांच्या काळापासून पक्षाशी जोडला गेलेला वर्ग पुन्हा पक्षाकडे परतेल, असा युक्तिवाद केला जातो आहे.विद्यामान अध्यक्ष निरुपम यांच्या हकालपट्टीसाठी मुंबई काँग्रेसमधील जवळपास सर्वच नेत्यांनी रविवारी खर्गे यांची भेट घेतली. तेव्हा निरुपम यांना दूर केल्यास अध्यक्षपदी कुणाला बसवायचे, या खर्गे यांच्या प्रश्नावर सर्वांनीच माजी मंत्री मिलिंद देवरा यांच्या नावाला सर्वांनी पसंती दिली. गटतट विसरून आम्ही देवरा यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असे आश्वासनही या नेत्यांनी त्यांना दिले. निरुपम यांच्याजागी माजी मंत्री मिलिंद देवरा यांच्याकडे सूत्रे सोपविल्यास पक्ष एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाईल, असा विश्वास या नेत्यांनी खर्गे यांना दिला.पक्षाला फायदा होईलपक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमध्ये मिलिंद देवरा यांचा समावेश असल्याने त्यांना पक्ष कशापद्धतीने वाढवायचा आहे, याची त्यांना कल्पना आहे. त्याचा पक्षाला निवडणूक काळात उपयोग होईल, असा दावा या नेत्यांनी केल्याचे सांगण्यात येते. कामत गटानेही स्वतंत्रपणे भेट घेत निरुपम हटावची हाक दिली. कामत यांच्या पश्चात त्यांच्या समर्थकांना काँग्रेसमध्ये रोखून धरणे आवश्यक असल्याने पक्षाला निरूपम यांच्याबाबत निर्णय घ्यावाच लागेल, अशी चर्चा काँग्रेसच्या विविध गटांमध्ये आहे.
काँग्रेस यंग ब्रिगेडमधील मिलिंद देवरा यांना पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 6:08 AM