वृत्त विश्लेषण, अतुल कुलकर्णी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या नेत्यांना त्यांच्या या निर्णयामुळे कसलाही धक्का बसल्याचे दिसत नाही. जे अपेक्षित होते तेच घडले अशा प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांकडून येत आहेत. काँग्रेसची विचारधारा किंवा ध्येयधोरणे पटली नाहीत म्हणून मिलिंद देवरा काँग्रेस सोडून जात आहेत असे नाही तर त्यांना स्वतःला खासदारकी मिळवायची आहे म्हणून ते जात असल्याची टीका काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. यातच सगळे आले.
काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते मुरली देवरा आणि मुंबई काँग्रेसचे अतूट नाते होते. त्यांच्यानंतर मिलिंद देवरा यांना लोकसभेवर जाण्याची संधी दक्षिण मुंबईच्या मतदारांनी दिली होती. मिलिंद देवरा यांना लोकसभेवर दोनवेळा संधी मिळाली. मात्र पुढे शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा यांचा पराभव केला. उद्धव ठाकरे शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही महाविकास आघाडी लोकसभेच्या जागा एकत्र लढवणार आहे. ज्या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत ते कायम ठेवण्याचाही निर्णय आघाडीने घेतला आहे. सावंत यांनी दोन वेळा आपल्याला पराभूत केले त्यांचाच प्रचार आपण का करायचा हा कळीचा मुद्दा मिलिंद देवरा यांच्यापुढे होता. येत्या काही महिन्यात राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होत आहेत. त्यात अनिल देसाई, कुमार केतकर, मुरलीधरन असे लोक आहेत. काँग्रेस कडून राज्यसभेची उमेदवारी आपल्याला मिळणार नाही. महाविकास आघाडी आपल्या सोबत येणार नाही. याची जाणीव झाल्याने मिलिंद देवरा यांनी अनिल देसाईच्या जागी आपला नंबर लावता येईल या दृष्टीने फिल्डिंग लावल्याचे बोलले जाते.
आपण जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलो तर राज्यसभेवर सहज जाता येईल असाही त्यामागे कयास आहे. शिवाय आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनाही घेऊन येण्याची तयारी देवरा यांनी केली आहे. नसीम खान यांचा पराभव शिवसेनेचे दिलीप लांडे यांनी केला होता. दिलीप लांडे आता एकनाथ शिंदे गटात आहेत. त्यामुळे नसीम खान यांना देखील मतदार संघ राहिलेला नाही. शिंदे गटात आल्यास तर विधान परिषदेवर संधी मिळेल आणि मंत्रीपदही मिळेल असे आश्वासन त्यांना देण्यात आल्याची चर्चा आहे. आपण मंत्री होणार असून शिवसेनेत जात आहोत, असे नसीम खान यांनी नजीकच्या लोकांना सांगितल्याचे काँग्रेसचे नेते सांगतात. काँग्रेसचे दुसरे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांना देखील भाजप मध्ये जायचे आहे. भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांचा पराभव केला होता. आता बसवराज पाटील यांना उस्मानाबाद लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. लिंगायत मताच्या बळावर आपण निवडून येऊ शकतो असे त्यांनी भाजप नेत्यांना सांगितल्याची माहिती आहे. अमीन पटेल यांच्या मागे भाजप शिवसेनेचे नेते लागले आहेत. मात्र त्यांनी अद्याप तरी काँग्रेस सोडण्याची तयारी दाखवलेली नाही. रावेरचे माजी खासदार उल्हास पाटील यांनी स्वतःच्या कन्येसाठी भाजपचा रस्ता निवडण्याचे निश्चित केल्याचे बोलले जात आहे. माजी खासदार प्रिया दत्त यांनी देखील स्वतःहून काँग्रेस सोडावी असे आता काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटत आहे.
मिलिंद देवरा गेल्या आठवड्यात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या शेजारी बसून मुंबईत काँग्रेसने निवडणूक कशी लढवायची याची चर्चा करत होते. ते आपल्याला सोडून जाणार याची कूणकूण लागलेली असतानाही मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवले नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी संजय निरुपम यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून दूर करावे म्हणून याच मिलिंद देवरा यांनी अट्टाहास केला होता. राहुल गांधी आणि अन्य नेत्यांनी त्यांच्या आग्रहाला मान देत संजय निरुपम यांना दूर करत मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद दिले होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर दोन-तीन महिन्यातच देवरा यांनी त्या पदाचाही राजीनामा दिला होता. मुंबईत पक्ष वाढीसाठी स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांनाही करू द्यायचे नाही हीच त्यांची आजपर्यंतची रणनीती राहिली आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी अन्य पक्षात जाणे हा खरोखर पक्षासाठी धक्का मानायला हवा. मात्र काँग्रेसचे नेते देवरा यांच्या पक्ष सोडण्याने आनंदी दिसत आहेत. हा देखील वेगळाच राजकीय प्रकार पाहायला मिळत आहेत.