मुंबई : राहुल गांधी यांच्या विश्वासातील नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी अखेर काँग्रेसचा हात सोडला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुंबई महापालिकेतील १० माजी नगरसेवकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी जाहीर प्रवेश केला. राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेला रविवारपासून सुरुवात होत असतानाच काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
दोन लोकसभा निवडणुकांत भाजप-शिवसेना युती राहिल्याने दक्षिण मुंबई मतदारसंघात खासदार अरविंद सावंत यांचा सहज विजय झाला. मात्र यावेळी ठाकरेंची शिवसेना आणि भाजपची युती नसल्याने या मतदारसंघात निवडणूक लढविण्यास मिलिंद देवरा पुन्हा एकदा उत्सुक होते. मात्र महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे जात असल्याने मिलिंद देवरा हे नाराज होते.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्निथला यांची भेट घेत देवरा यांनी आपली भूमिका मांडली होती. अखेर देवरा यांनी रविवारी सकाळीच एक्सवरून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केला. रविवारी दुपारी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन त्यांनी सपत्नीक गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर कुलाबा येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले आणि वर्षा बंगल्यावर आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
‘विरोध करतील, तसे ते खड्ड्यात जातील’ जितके विरोधात बोलतील, तितके खड्ड्यात जातील. लोकांची कामे करणाऱ्यांना लोक साफ करीत नाहीत, तर घरात बसलेल्यांना नक्कीच साफ करतात, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. देवरांसारखे अभ्यासू लोक सोबत आहेत, अशा शब्दांत त्यांनी स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध इतकेच काँग्रेसला माहीत : मिलिंद देवरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणे इतकेच फक्त काँग्रेसला माहीत आहे, असा आरोप करतानाच जर काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांनी सकारात्मक, मेरिट आधारित राजकारण केले असते, तर आज एकनाथ शिंदे आणि मला इथे येऊन बसावे लागले नसते, असे मिलिंद देवरा यांनी यावेळी नमूद केले.
२०१९ नंतर ११ नेते गेले सोडून
अलीकडच्या काळात मिलिंद यांच्यासह ११ बड्या नेत्यांनी पक्षाकडे पाठ फिरवली आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी मे २०२२ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला.गुलाम नबी आझाद यांनी २०२२ मध्ये पक्षाचा राजीनामा दिला. प्रचार समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर काही तासांतच त्यांनी राजीनामा दिला होता. त्याशिवाय हार्दिक पटेल, माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार, सुनील जाखड, आर. पी. एन. सिंह, ज्योतिरादित्य सिंधिया, जितीन प्रसाद, अल्पेश ठाकोर अनिल अँटनी यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली.