आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मिलिंद देवरा अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 05:28 AM2019-04-20T05:28:36+5:302019-04-20T05:29:03+5:30
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने दक्षिण मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना नोटीस पाठविली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने दक्षिण मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना नोटीस पाठविली आहे. जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजविल्याचे विधान त्यांनी भुलेश्वर येथील भाषणात केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केल होती. याची दखल आयोगाने घेतल्याने देवरा यांच्या अडचणीत भर पडली आहे.
दक्षिण मुंबईत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत आहे. काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी भुलेश्वर येथील प्रचार सभेत शिवसेनेविरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप होता. दक्षिण मुंबईत जैन समाजाचे मतदार मोठ्या संख्येने आहेत. यामुळे यामुळे सेनेच्या वतीने अॅड. धर्मेंद्र मिश्रा आणि सनी जैन यांनी ८ एप्रिल रोजी देवरांविरोधात आयोगाकडे तक्रार केली होती. त्यासोबत देवरा यांच्या भाषणाची सीडीही पाठवली होती.
या भाषणाच्या क्लिपमध्ये प्रथमदर्शनी देवरांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे दिसून येत असल्याची नोंद निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. तरी या भाषणाच्या सीडीचे अवलोकन करून त्यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबाबत कारवाई करण्यात यावी. तसेच या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले.