मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांना आम आदमी पार्टीचे कौतुक चांगलेच महागात पडले आहे. देवरा यांना काँग्रेस सोडायची असेल तर त्यांनी जरूर सोडावी, पण अर्धवट माहितीवरून आपचे कौतुक करू नका, अशा शब्दांत काँग्रेस नेत्यांनी देवरा यांची खरडपट्टी काढली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर देवरा यांनी रविवारी रात्री केजरीवाल यांच्या भाषणाचा व्हिडीओ टिष्ट्वट केला. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकारने पाच वर्षांत राज्याचा महसूल दुपटीने वाढवला. आर्थिक तारतम्य बाळगणाऱ्या राज्यांच्या यादीत दिल्लीचा नंबर वरचा असल्याच्या आशयाचे टिष्ट्वट देवरा यांनी केले. काँग्रेस नेत्यांना मात्र देवरा यांचे हे टिष्ट्वट फारसे रूचले नाही. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी देवरा यांचा समाचार घेतला.
माकन यांनी देवरा यांचा समाचार घेताना काँग्रेस सरकारच्या काळातच दिल्लीतील महसुलात लक्षणीय वाढ झाल्याचा दावा आकडेवारीसह केला. त्यावर, माकन यांनीच शीला दीक्षितांच्या कामाला कमी लेखल्याचा आरोप देवरा यांनी केला.काँग्रेस पदाधिकारी आणि दिल्लीतील उमेदवारांनीही या वादात उडी घेतली. जनकपुरी विधानसभा मतदारसंघातील पराभूत काँग्रेस उमेदवार राधिका खेरा यांनीही नापसंती व्यक्त केली. काँग्रेस कार्यकर्त्यांना ज्येष्ठांकडून पाठबळाची अपेक्षा असते. दुर्दैवाने काँग्रेसमधील काही ज्येष्ठ आपचे गुणगान करण्यात मश्गूल आहेत. माझ्यासारख्या नवख्यांसाठी हे निराशाजनक आहे. दीक्षितांच्या काळात उच्चांकी कामगिरी झाल्याचा दावा, खेरा यांनी केला. तर, राहुल गांधी यांनी अंबानी, अदानीविरोधी भूमिका घेतल्यानेच देवरा यांची नाराजी उफाळल्याचा आरोप झाला....तेव्हा गिटार वाजवत बसायचेदिल्लीच्या नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्षा अलका लांबा यांनीही देवरा यांचा समाचार घेतला. ‘वडिलांच्या नावावर पक्षात यायचे, या राजकीय वारशाच्या जोरावर निवडणुकीत उमेदवारी मिळवायची, पक्षाचे नेतृत्व स्वत:कडे असतानाही निवडणुकीत पराभूत व्हायचे. पण, जेव्हा पक्षासाठी संघर्ष करायची वेळ येते तेव्हा गिटार वाजवत बसायचे,’ असे टिष्ट्वट करत लांबा यांनी नाराजी व्यक्त केली.