मुंबई : आयोगाच्या सुनावणीला तब्बल तीन तास विलंब केल्याने कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे अध्यक्ष जे. एन. पटेल व सदस्य सुमित मलिक यांनी मिलिंद एकबोटे यांचे वकील नितीन प्रधान यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही रक्कम टाटा मेमोरियल ट्रस्टमध्ये जमा करण्याचा आदेश गुरुवारी आयोगाने प्रधान यांना दिला.नितीन प्रधान हे कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांच्या वतीने साक्षीदारांची उलटतपासणी घेत आहेत. सत्यशोधक समितीचे सहनिमंत्रक भीमराव बनसोड यांची उर्वरित उलटतपासणी गुरुवारी दुपारी तीन वाजता घेण्यात येणार होती. मात्र प्रधान अनुपस्थित असल्याने आयोगाचे कामकाज संध्याकाळी सहा वाजता सुरू झाले.आयोगापुढे उपस्थित राहिल्यावर प्रधान यांनी झालेल्या विलंबाबद्दल आयोगाची माफी मागितली. उच्च न्यायालयात एका महत्त्वाच्या प्रकरणात अंतिम सुनावणीत युक्तिवाद करत होतो, असे स्पष्ट केले. आयोगाने त्यांची माफी स्वीकारली. मात्र इतरांपर्यंत चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी २५ हजार दंड ठोठावत असल्याचे स्पष्ट केले. तसेच दंड त्यांच्या अशिलाकडून वसूल न करता त्यांनी स्वत: दंडाची रक्कम टाटा मेमोरियल ट्रस्टकडे जमा करावी, असे सांगितले. त्यावर प्रधान यांनी ही रक्कम आपण स्वत: भरू, असे आश्वासन आयोगाला दिले.‘विजयस्तंभाला भेट देण्यासाठी आलो होतो’साक्षीदार बनसोड यांची प्रधान यांच्या उलटतपासणीत उत्तर देताना सांगितले की, कोरेगाव भीमा हिंसाचाराबद्दल सत्य शोधण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग नव्हता. भारत पाटणकर यांनी यासंदर्भात बैठका बोलविल्या होत्या. औरंगाबादहून पुण्याला केवळ विजयस्तंभाला भेट देण्यासाठी आलो. एल्गार परिषदेसाठी आलो नाही, असेही बनसोड यांनी सांगितले.
मिलिंद एकबोटे यांच्या वकिलाला २५ हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 4:53 AM