शिवसेनेचे संख्याबळ वाढले, आ.शंकरराव गडाख यांचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 07:32 PM2019-10-28T19:32:22+5:302019-10-28T20:09:30+5:30
नेवासा मतदारसंघातील आमदार शंकरराव गडाख यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेत पाठिंब्याचे पत्र दिले आहे.
नेवासा : शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी सोमवार २८ ऑक्टोबर रोजी पाडव्यानिमित्त माजी खासदार यशवंतराव गडाख व आमदार शंकरराव गडाख यांची सोनई येथील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर आता आमदार शंकरराव गडाख यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेत पाठिंब्याचे पत्र दिले आहे.
नेवासा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर क्रांतिकारी शेतकरी पार्टीचे उमेदवार शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आलेले आहेत. ते कुठल्या पक्षात जातील या कडे संपूर्ण नेवासा तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते.मात्र आज सोमवार २८ ऑक्टोंबर रोजी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर हे माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या भेटीसाठी आल्यानंतर कुटुंबीयांसोबत काढलेला फोटो आणि आमदार शंकराव गडाख यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शिवसेनेचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या सोबत माजी खासदार ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख साहेब यांचे काढलेले जुने फोटो व्हायरल केल्याने आणि कार्यकर्त्यांनी फेसबुक व व्हाट्सऍप वर स्टेटसला ठेवल्याने दुपारनंतर नेवासा तालुक्यात शंकरराव गडाख हे शिवसेनेत दाखल झाल्याची चर्चा सुरू होती.
त्यामुळे आता कुठल्या पक्षात जातील या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान सायंकाळनंतर आ.गडाख हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले.तर गडाख यांचे कार्यकर्ते एकमेकांना जय महाराष्ट्र करतांना दिसत होते.