मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर केलेल्या आरोपांना केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यासारखे महत्वाचे नेते उपस्थित नव्हते, याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी नारायण राणे यांनी केलेल्या खोचक टीकेवर मिलिंद नार्वेकर यांनी एका ओळीत पलटवार केला आहे. आता, मिलिंद नार्वेकर यांच्या प्रत्युत्तरावर राणेपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी पलटवार केला आहे.
नारायण राणे हे अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. ते जेव्हा शिवसेनेत नेते होते, तेव्हा मिलिंद नार्वेकर कुठेतरी मागे उभे असायचे. नॅपकिन पकडून, पाण्याची बाटली पकडून असायचे, त्यांना बसायलाही जागा नव्हते. कशीतरी खुशामतगिरी करुन ते आज इथे पोहोचले आहेत, ते कुणीही पोहोचतं, असे म्हणत राणेपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलंय. मिलिंद नार्वेकर हल्ली ट्विटवर सक्रीय आहेत, मोठ्या सेलिब्रिटींवर आणि नारायण राणेंवर टीका करण्यासाठी ते ट्विटवर असतात. हा माणूस कधी निवडणुकीला उभारला नाही. कोणाला तिकीट द्यायचं, कोणाचं तिकीट का कापायचं याचं काम नार्वेकर करतात. शिवसेनेत तिकीट विकणारा एंजट कोण असेल तर ते मिलिंद नार्वेकर... असा गंभीर आरोपही निलेश राणे यांनी केला आहे.
मिलिंद नार्वेकर राणेंच्या मेडिकल कॉलेजबद्दल बोलतात, पण ठाकरेंनी कधी 10 बेडचं हॉस्पीटल तरी बांधलंय का?. सध्या जे चाललंय ते सरकारी पैशावर. नारायण राणेंनी मेडिकल कॉलेजसाठी फोन केला असेल, पण राज्यातील सर्वच मेडिकल कॉलेजच्या परवानग्यांसाठी त्याच्या फाईल मुख्यमंत्र्यांकडे जातात. त्यासाठी, फोन केला म्हणून काय झालं, उद्धव ठाकरे काय पाकिस्तानचे आहेत का? असा सवालही निलेश राणेंनी उपस्थित केला. मेन कलाकार बघून घेतील साईडवाल्यांनी लक्ष घालू नये, असेही राणे यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते नारायण राणे
कोण मिलिंद नार्वेकर? मातोश्रीवर बॉयचे काम करायचा तोच ना? अहो माझ्यासमोरची गोष्ट आहे. बेल मारली की, यस सर काय आणू? असे म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली. याला मिलिंद नार्वेकर यांनी केवळ एका ओळीत प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे यांची पत्रकार परिषद झाल्यावर अवघ्या काही मिनिटांत नार्वेकर यांनी एक ट्विट करत पलटवार केला.
मिलिंद नार्वेकरांचं ट्विट
बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?, असे ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी केले आहे. दुसरीकडे, हल्ली अॅडव्होकेट जनरलला मार्गदर्शन करतात. कुणाला कुठे अटक करायची याबाबत त्यांचेच फोन जातात. आता ते आत गेल्यावर त्यांना किती फोन जातात हा प्रश्न आहे, या शब्दांत नारायण राणे यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला.