दुधाच्या कमिशनचा तिढा सुटेना !

By admin | Published: April 30, 2015 02:06 AM2015-04-30T02:06:00+5:302015-04-30T02:06:00+5:30

पिशवीबंद दूध विक्रीवरील कमिशनच्या मुद्द्यावर बुधवारी दूध विक्रेते आणि कंपन्यांमध्ये पार पडलेली बैठक फिसकटली.

The milk commission is not allowed! | दुधाच्या कमिशनचा तिढा सुटेना !

दुधाच्या कमिशनचा तिढा सुटेना !

Next

मुंबई : पिशवीबंद दूध विक्रीवरील कमिशनच्या मुद्द्यावर बुधवारी दूध विक्रेते आणि कंपन्यांमध्ये पार पडलेली बैठक फिसकटली. त्यामुळे १ मेपासून महानंद, अमूल, गोकूळ, वारणा, मदर डेअरी या पाच नामांकित दूध कंपन्यांच्या दूध वितरणावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर विक्रेते ठाम आहेत.
दरम्यान, अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी दूध विक्रेते आणि कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यात सकारात्मक तोडगा काढण्याचे आदेश देत दोघांच्या भांडणात ग्राहकांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले. त्यावर दूध कंपन्यांनी सकारात्मक चर्चा करण्याची तयारी दर्शवत विक्रेत्यांनी पुकारलेल्या बहिष्काराचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र लेखी आश्वासन मिळाले तरच आंदोलन मागे घेण्याचा पवित्रा विक्रेत्यांनी घेतला होता.
कोणत्याही कंपनीने लेखी आश्वासन न दिल्याने १ मेपासून पाचही कंपन्यांच्या दूध वितरणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे अखिल महाराष्ट्र दूध विक्रेता संघाचे अध्यक्ष शरद पाटोळे यांनी सांगितले. पाटोळे म्हणाले की ठाणे, दिवा, कल्याण परिसरात पाचही कंपन्यांचे पिशवीबंद दूूध विक्री बंद करण्यात आली आहे.
ग्राहकांची गैरसोय होणार नाही
पाच नामांकित दूध कंपन्यांच्या पिशवीबंद दूध विक्री बंद केल्यानंतरही ग्राहकांची गैरसोय होणार नाही, अशी शाश्वती विक्रेता संघाने ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. पाच कंपन्यांच्या दुधाला पर्याय म्हणून ग्राहकांना इतर नामांकित दूध कंपन्यांच्या पिशवीबंद दुधाचा पर्याय उपलब्ध केला जाईल. तसे इतर कंपनींसोबत बोलणेही झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना दुधाचा तुटवडा होणार नाही, अशी हमीही संघाने दिली आहे. (प्रतिनिधी)

गोकूळची तयारी
गोकूळने लवकरच एमआरपीच्या किमतीत एक रुपयाने वाढ करून दुकानदारांना एक रुपये कमिशन वाढ देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. त्यामुळे किमान गोकूळ दुधावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विक्रेत्यांनी मागे घेण्याचे आवाहन असोसिएशनचे सचिव राजू पाटील यांनी केले आहे.

Web Title: The milk commission is not allowed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.