कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विविध मागण्यांसाठी मंगळवारी पुकारलेल्या राज्यव्यापी दूध आंदोलनास हिंसक वळण लागले. ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दूध वाहतूक रोखून वाहनांची तोडफोड करत दूध रस्त्यांवर ओतून सरकारचा निषेध नोंदविला.
अनेक गावा-गावांत ग्रामदैवतांना दुधाचा अभिषेक घालून सरकारला सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली. दुधास प्रतिलिटर पाच रुपये तर दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे, केंद्र सरकारने पावडर आयातीचा निर्णय मागे घ्यावा, ३० हजार टन पावडरचा बफर स्टॉक करावा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची हाक दिली होती. कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ), वारणा दूध संघाने आपले संकलन सुरू ठेवल्याने ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणणार दुग्धविकासमंत्र्यांची माहिती
दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन पेटले असून आंदोलकांनी लाखो लिटर्स दूध रस्त्यावर ओतून दिले. मुंबईकडे जाणारे दुधाचे टँकर्स अडविण्यात आले. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी मंत्रालयात बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
साताºयातही मंदिरांमध्ये दुधाचा अभिषेक
फलटण तालुक्यात विविध ठिकाणी ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरांमध्ये दुधाचा अभिषेक करून आंदोलन करण्यात आले. खटाव तालुक्यातील गोपूजमध्ये शंभू महादेवाला प्रतीकात्मक दुग्धाभिषेक घालून आंदोलनास सुरुवात करण्यात आली.