भेसळीमुळे कोसळत आहेत दुधाचे दर?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 10:56 AM2023-12-02T10:56:12+5:302023-12-02T10:56:39+5:30
Milk Price: शेतकऱ्यांची मदार असलेल्या दुधाच्या जोडधंद्यानेही दगा दिला असून दुधाचे दर ३४ रुपये प्रतिलिटरवरून थेट २५ ते २६ रुपये प्रतिलिटरवर येऊन पोहोचले आहेत.
मुंबई - बदलत्या हवामानाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना सध्या शेतमालाच्या कोसळणाऱ्या दरांचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता शेतकऱ्यांची मदार असलेल्या दुधाच्या जोडधंद्यानेही दगा दिला असून दुधाचे दर ३४ रुपये प्रतिलिटरवरून थेट २५ ते २६ रुपये प्रतिलिटरवर येऊन पोहोचले आहेत. अनेक भागांत पाणी आणि चाराटंचाई होत असताना दूध दरही पडल्याने शेतकऱ्यांची सर्वच बाजूने कोंडी झाल्याचे चित्र आहे.
दर पडण्याचे कारण काय?
सहा महिन्यांपूर्वीही असेच दर पडले अन् दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले. त्यानंतर खासगी दूध संघाच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने सरकारी अधिकारी, दूध उत्पादक, दूध उत्पादक संघाचे सदस्य यांची एक समिती स्थापन करून ३४ रुपये दर निश्चित केला होता. पण हा दर तीन महिन्यांच्या वर टिकला नाही.
त्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर घसरले हे कारण दिले जात आहे. प्रत्यक्षात भेसळीचे दूध बाजारात येत असून त्याचा फटका प्रामाणिक शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप शेतकरी व शेतकरी नेत्यांनी केला आहे.
भेसळीमुळे अतिरिक्त दूध तयार होत असल्याने मागणी-पुरवठा संतुलन बिघडले आहे. दूधसम्राट नेहमीप्रमाणे आंतरराष्ट्रीय दूध पावडरचे दर घसरले, साठा वाढला असा कांगावा करून दर पाडत आहेत.
- सतीश देशमुख, अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेक्च्युअल्स
शेतकऱ्यांचे लक्ष जातीय आरक्षणाच्या मुद्द्याकडे केंद्रित करून खासगी दूध संघाने संगनमत करत पुन्हा एकदा नगर, नाशिक पट्ट्यामध्ये दुधाचे दर पाडले आहेत. ज्या भागात सहकारी दूध संघ आहेत त्या भागात दर चांगला मिळतोय पण ज्या भागामध्ये खासगी दूध संघ आहेत त्या भागात दुधाचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
- अजित नवले, शेतकरी नेते, किसान सभा