लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या एफआरपीच्या धर्तीवर राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा सरकार प्रयत्न करेल. याबाबतचा मसुदा तयार करण्याचे काम तातडीने सुरू केले जाईल, असे आश्वासन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी शुक्रवारी दूध उत्पादक शेतकरी आणि संघटनांच्या नेत्यांना दिले.
लाॅकडाऊनच्या काळात दुधाचे दर पडल्याने विविध संघटनांनी सध्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर दू्ध दर वाढीसह अन्य मागण्यांबाबत शुक्रवारी मंत्रालयात बैठक झाली. मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार सदाभाऊ खोत, अनिल बोंडे, किसान सभेचे अजित नवले, किरण लहमटे यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री केदार यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी लागू करण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी प्रतिनिधी, शासकीय आणि खासगी दूध संघ यांच्या सूचना ऐकून घेतल्या. लगेचच याविषयीच्या सर्व बाजूंचा अभ्यास करण्यात येणार असून, याबाबत निर्णय घेऊन अंमलबजावणीची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगितले.
दूध दराचा प्रश्न वारंवार निर्माण होतो. त्यामुळे यावर ऊसाच्या एफ. आर. पी.च्या धर्तीवर किमान आधारभूत किंमत तसेच मिळकतीतील वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरिंगच्या माध्यमातून दूध उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी संघटनांनी केली. यावर सहकारी आणि खासगी कंपन्यांना लागू होईल, अशा पद्धतीने कायदा करण्याचा मानस असल्याचे मंत्री केदार यांनी सांगितले. तर किमान लाॅकडाऊनपूर्वीचा दर देण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. यावर तातडीने संबंधितांशी चर्चा केली जाईल. त्यामुळे आठवडाभरात दुधाचे दर वाढतील, असे केदार यांनी स्पष्ट केले.
यासोबतच शेतकऱ्यांनी डेअरीला दूध दिल्याबरोबर पावती देण्याच्या आणि पावतीवरील मजकूर अंतिम करण्याच्या सूचना देण्यात येतील. पशुधनाच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील. अधिकारी - कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया अधिक गतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे केदार यांनी सांगितले.
या बैठकीला रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, दीपक भोसले, भानुदास शिंदे, पांडुरंग शिंदे, सुहास पाटील, शेतकरी नेते धनंजय धोरडे, उमेश देशमुख, खासगी दूध संघाचे प्रमुख दशरथ माने, प्रकाश कुतावळ उपस्थित होते.
..........................................................................