Join us

प्लॅस्टिकबंदीमुळे दूधदर वाढणार नाहीत, पिशवीसाठी फक्त ५० पैसे डिपॉझिट लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 5:18 PM

याशिवाय, प्लॅस्टिकचे संकलन करण्यासाठी राज्यभरात कलेक्शन पॉईंटस तयार करण्याचे निर्देशही सरकारकडून देण्यात आले आहेत.

मुंबई: महाराष्ट्र सरकारकडून राज्यात प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी करण्यात आल्यानंतर शनिवारी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्लॅस्टिकबंदीबाबतच्या अनेक शंका दूर केल्या. प्लॅस्टिक बंदीमुळे पिशवीतून मिळणाऱ्या दुधाचे दर वाढतील, अशी चर्चा होती. मात्र, रामदास कदम यांनी दुधाच्या दरात कोणतीही वाढ होणार नसल्याचे स्पष्ट केले. केवळ पिशवीबंद दुधाची खरेदी करताना 50 पैसे डिपॉझिट म्हणून घेतले जातील. या पिशव्या दूध डेअरी, वितरक आणि विक्रेते यांना पुनर्खरेदी करणे बंधनकारक असेल. ग्राहकाने दुधाची रिकामी पिशवी केल्यावर ग्राहकाला ते पैसे परत मिळतील.तसेच एक आणि अर्धा लीटरच्या प्लास्टिक बाटलीसाठीही एक आणि दोन रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. दुकानदार आणि विक्रेते यांना या बाटलीची पुर्नखरेदी करणे बंधनकारक असेल. बॉटल परत केल्यावर ग्राहकांना एक आणि दोन रुपये परत मिळतील. मात्र, जर ग्राहकाने दुधाची पिशवी व प्लास्टिक बॉटल परत केली नाही, तर त्यांचे पैसे वाया जाणार आहेत.प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर जास्तीत जास्त २५ हजार आणि तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा होईल अशी कायद्यात तरतूद करण्यात आली असून दर तीन महिन्यानी या बंदीचा आढावा घेऊन त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात येणार आहे. याशिवाय, प्लॅस्टिकचे संकलन करण्यासाठी राज्यभरात कलेक्शन पॉईंटस तयार करण्याचे निर्देशही सरकारकडून देण्यात आले आहेत. तर उत्पादक आणि व्यापाऱ्यांना रिसायकल करण्याची सक्ती करण्यात आली आहे. 

टॅग्स :प्लॅस्टिक बंदीरामदास कदम