मुंबईमध्ये एक आठवडा दूधटंचाई सुरूच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 02:27 AM2019-08-10T02:27:57+5:302019-08-10T06:22:01+5:30

दूध संकलन थांबले; सांगली, कोल्हापूरमधून होणारा पुरवठा बंदच

Milk scarcity will continue for one week in Mumbai | मुंबईमध्ये एक आठवडा दूधटंचाई सुरूच राहणार

मुंबईमध्ये एक आठवडा दूधटंचाई सुरूच राहणार

googlenewsNext

नवी मुंबई : मुंबई, ठाणे व उपनगरांमध्ये प्रतिदिन ९० लाख लीटर दुधाची गरज आहे; परंतु सद्यस्थितीमध्ये ४५ ते ५० लाख लीटर आवक होत आहे. यामुळे दूधटंचाई सुरूच असून पुढील एक आठवडा मुंबईकरांची गैरसोय सुरूच राहणार आहे.

देशातील दुधाची सर्वाधिक विक्री मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरामध्ये होत असते. देशाच्या विविध भागातून ९० लाख लीटरपेक्षा जास्त आवक होत असते. यामध्ये ७० टक्के वाटा पश्चिम महाराष्ट्राचा आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली व पुणे परिसरातून दूध मोठ्या प्रमाणात मुंबईत विक्रीसाठी येत असते. गुजरातवरून अमूल दूध विक्रीसाठी येत असते. पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. तीन दिवस गोकूळ, वारणाचे संकलन पूर्णपणे थांबले होते.

इतर छोट्या दूध डेअरीच्या व्यवहारावरही परिणाम झाला आहे. मागणीपेक्षा ५० टक्के आवक कमी होत आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी गुजरात व इतर ठिकाणावरून दूध जास्त प्रमाणात मागविले जात आहे. वारणा दूध व्यवस्थापनाने शुक्रवारी दोन लाख लीटर दूध उपलब्ध केले असून त्याचे वितरण केले आहे. येथील व्यवस्थापनाने सांगितले की, कोल्हापूर परिसरात दूध संकलन करणे अवघड झाले आहे. प्रत्येक गावामध्ये संकलन करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पण त्यामध्ये अडथळे येत आहेत. पुढील एक आठवडा तरी टंचाई कायम राहण्याची शक्यता आहे.

भाजीपाल्याची आवक वाढली
मुंबईमधील भाजीपाल्याची टंचाई दूर करण्यासाठी व्यापाऱ्यांनी उपलब्ध होईल तेथून भाजीपाला मागविण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी तब्बल ९५ ट्रक व ५९५ टेम्पो अशा ६९० वाहनांची आवक झाली आहे. ७ लाख ७१ हजार जुडी पालेभाज्या व ३ हजार ४३६ टन इतर भाज्यांची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर २० टक्क्यांनी घसरले आहेत. अशीच आवक सुरू राहिली तर दर नियंत्रणात येतील अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. नाशिक, पुणे, गुजरात व इतर ठिकाणांवरून भाजीपाला विक्रीसाठी येत आहे.

दुधाचे संकलन पूर्णपणे बंद आहे. ग्रामस्थ पुरामध्ये अडकले आहेत. जनावरेही अडकली आहेत. यामुळे दुधाची टंचाई भासत असून दूध संकलन सुरळीत झाल्यानंतरच मुंबईला नियमित दूध पुरविणे शक्य आहे.
- सुरेंद्र तासकर, वारणा

मुंबईला गुजरातचे दूध
कोल्हापूर, सांगलीला आलेल्या पुरामुळे तिथले दूध संकलन बंद झाले आहे, तर बहुतांश कंपन्यांकडील दुधाचा अतिरिक्त साठा तीन दिवस वापरल्यानंतर तो देखील संपलेला आहे. पर्यायी मुंबईसह उपनगरांमधील ग्राहकांना गुजरात, अहमदनगर व नाशिकचे दूध पुरवले जात आहे, तर काहींनी खुले दूध खरेदीकडे कल वळवला आहे. मात्र, दुधाच्या तुटवड्यामुळे घसरलेल्या दर्जाबाबात ग्राहकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
- विठ्ठल बांगर, दूध व्यावसायिक

Web Title: Milk scarcity will continue for one week in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.