Join us

Milk Supply : आता माघार नाही; ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 10:35 AM

''सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार असेल तर आम्हाला बैठकीला बोलावलं नाही तरी चालेल''

मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दूध दरवाढीसाठी छेडलेल्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. अद्यापपर्यंत दूध दरवाढीसंदर्भात कोणताही तोडगा न निघाल्यानं संघटनेनं आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.  ''सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार असेल तर आम्हाला बैठकीला बोलावलं नाही तरी चालेल.  मात्र जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार'', असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. पत्रकार परिषद घेऊन राजू शेट्टी यांनी आपली भूमिका मांडली आहे. 

मात्र, आंदोलन शांततेच्या मार्गानं सुरू राहणार असल्याचंही यावेळी शेट्टी यांनी  स्पष्ट केले. आपल्या कार्यकर्त्यांना कायदा हातात न घेण्याचं आवाहनही यावेळी त्यांनी केले. शेतकऱ्यांना किमान 25 ते 27 रुपये भाव मिळालाच पाहिजे, ते कसं शक्य आहे हे आम्ही सरकारला दाखवून दिले आहे. शिवाय, राज्य सरकार कर्मचाऱ्यांना बोनस देते मग दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान का देत नाही,' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी त्यांनी सरकारसोबत चर्चेसाठी तयार असल्याचंही सांगितले.

मनसेचे मानले आभार शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या मनसेचे राजू शेट्टी यांनी आभार मानले आहेत. अनेक पक्ष आणि संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.

आज नागपुरात महत्त्वाची बैठकगुरुवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यात तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. साखरेप्रमाणे निश्चित दर हाच दुधावर तोडगा असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.  

दरम्यान,  आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी (18 जुलै) मध्यरात्री 12 ते 2.30 वाजेपर्यंत राजू शेट्टी आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात बैठक चालली. मात्र कोणताही तोडगा न निघाल्यानं ही बैठक निष्फळ ठरली आहे. दरम्यान, राजू शेट्टींचा निरोप घेऊन गिरीश महाजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. ''सरकारकडून चर्चेसाठी उशीर झालेला नाहीय.  मी सुरुवातीपासून राजू शेट्टींच्या संपर्कात होतो. राजू शेट्टींच्या मागण्या समजून घेतल्या आहेत, एक दोन दिवसात हे आंदोलन संपवू'', असे महाजन यांनी सांगितले  आहे. राजू शेट्टी यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

- शांततेच्या मार्गानं आमचे आंदोलन सुरूच राहणार -राजू शेट्टी - महाराष्ट्रातून बाहेरील राज्यांना दूध जायला हवे - राजू शेट्टी - बाहेरील राज्यातील दुधाला अनुदान मिळते, मग आमच्या शेतकऱ्यांना अनुदान का नाही? - राजू शेट्टी - शेतकऱ्यांना किमान 25 ते 27 रुपये भाव मिळालाच पाहिजे, ते कसं शक्य आहे हे आम्ही सरकारला दाखवून दिले आहे - राजू शेट्टी- सरकारला वेळ लागणार असेल तर वेळ देऊ, पण दीर्घकालीन मार्ग निघावा - राजू शेट्टी- कायदा हातात न घेण्याचं राजू शेट्टी यांचं आंदोलकांना आवाहन

आंदोलन अधिक तीव्र होणार

दरम्यान, दुधाच्या प्रश्नावर तोडगा निघत नसल्यानं सरकारची नाकेबंदी करण्यासाठी गुरुवारपासून आंदोलन आणखी तीव्र करण्यात येत आहे. शेतकरी जनावरांसह रस्त्यावर उतरले आहेत. 

 

टॅग्स :दूध पुरवठाराजू शेट्टीशेतकरी संपमुंबई