Milk Supply : राजू शेट्टी सरकारसोबत चर्चेस तयार नाहीत - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 12:00 PM2018-07-16T12:00:02+5:302018-07-16T12:14:42+5:30
मुंबईमध्ये दूध टंचाई निर्माण होऊ देणार नाही. यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल
मुंबई - दुधाला प्रतिलिटर ५ रुपये दरवाढ मिळावी या मागणीसाठी राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचं पाहायला मिळत आहे. आंदोलनाचा एक भाग म्हणून काही संघटनांनी दूध संकलन बंद ठेवलेत. दूध संघाने दोन दिवस आधीच मुंबईला होणारा दूध पुरवठा वाढवून किमान दोन दिवस दूधटंचाई भासणार नाही याची काळजी घेतली. मुंबईचा दूध पुरवठा खंडीत करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे आंदोलन छेडले आहे.
दरम्यान, राजू शेट्टींसोबत चर्चा करण्यास आम्ही तयार आहेत. पण ते चर्चा करण्यास तयार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवाय, मुंबईमध्ये दूध टंचाई निर्माण होऊ देणार नाही. यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी चर्चेला कधी बोलावले याचे पुरावे सादर करावे, आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यास तयार आहोत, असं स्पष्टीकरण राजू शेट्टी यांनी दिले आहे.
राज्यातील विविध भागात स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथे कार्यकर्त्यांनी दुधाचे टँकर फोडून दूध रस्त्यावर सांडले आहे. तर काही ठिकाणी दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून देण्यात आल्या आहेत. तसेच राजू शेट्टींच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. नागपूरमध्ये दूध दरप्रश्नी विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरातून गोकुळ संघाचं दूध मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तात गोकुळचे 12 टँकर मुंबईला रवाना करण्यात आले.