४१ वर्षांनंतरही गिरणी संप सुरूच, १ लाख ७० हजार कामगार अद्यापही घरांच्या प्रतीक्षेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 07:26 AM2023-01-19T07:26:16+5:302023-01-19T07:26:37+5:30
म्हाडाने केवळ १७ हजार गिरणी कामगारांना घरे दिली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: घरादाराची राखरांगोळी झाली, नव्या पिढीची स्वप्नेही पूर्ण होऊ शकली नाहीत. हातची नोकरी तर गेली, वर पगारवाढदेखील मिळाली नाही. असा काहीसा १८ जानेवारी १९८२ रोजी सुरू झालेला गिरणी कामगारांचा संप आजही संपलेला नाही. आजही १ लाख ७० हजार गिरणी कामगार घरांच्या प्रतीक्षेत आहे. म्हाडाने केवळ १७ हजार गिरणी कामगारांना घरे दिली आहेत.
गिरण्यांच्या चाळीनी २०० एकर जागा व्यापली आहे. चार एफएसआय दिला तर ४० एकर जागेवर चाळीमधील गिरणी कामगारांचे पुनर्वसन होईल. आज एकूण १४ संघटना गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी लढत असल्याचे गिरणी कामगार नेते प्रवीण घाग यांनी सांगितले.
संप काळात काय झाले?
- गिरणी कामगारांची ताकद कमी झाली.
- गिरणी मालकांनी गिरण्यांची खाती बंद केली. कपडा खाता बंद करण्याचे धोरण अवलंबिले गेले.
- पगार देणे बंद केले.
- स्वेच्छानिवृत्ती लागू केली.
- गिरणी कामगारांना पगारवाढ मिळाली नाही.
- २००० मध्ये मुंबईतील सगळ्या म्हणजे ६० गिरण्या बंद झाल्या.
- २४ हजार कामगारांना मिळतील घरे
- ६० गिरण्यांपैकी १८ गिरण्यांची एक तृतीयांश जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळालेली नाही. ती मिळाली तर मुंबईत २४ हजार गिरणी कामगारांना घरे मिळतील.
३५% - २ लाख ५० हजार कामगारांपैकी ३५ टक्के कामगारांचा मृत्यू झाला आहे.
६०% - कामगार जिवंत आहेत. मात्र, त्यांचे वय ६० च्या पुढे आहे.