मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते; पण मार्च २०२० पासून निवृत्त झालेल्या गिरणी कामगारांना निवृत्तिवेतनाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त केली आहे.
एका कर्मचाऱ्याने सांगितले की, केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या राष्ट्रीय वस्त्रोउद्योग महामंडळाच्या अंतर्गतच्या मुंबईत टाटा मिल, इंडिया युनायटेड मिल नंबर ५, पोद्दार मिल तसेच सोलापूरमध्ये बार्शी येथील बार्शी मिल, फिनले मिल अशा पाच गिरण्या येतात. तसेच काही कापड दुकाने आहेत, यामध्ये साधारण चार हजार कर्मचारी, अधिकारी आणि तात्पुरते कर्मचारी आहेत. लॉकडाऊनपासून १०० हून अधिक कर्मचारी निवृत्त झाले आहेत; पण त्यांना निवृत्तिवेतन मिळाले नाही. निवृत्तिवेतन मिळणार त्यानुसार नियोजन केले जाते. सोसायटीचे कर्ज फेडणे, मुलांचे लग्न, घरबांधणीचे काम केले जाते. मात्र वर्षभर ही रक्कम न मिळाल्याने जे कर्ज घेतले होते त्याचे व्याज भरावे लागत आहे, अशी व्यथा एका गिरणी कामगाराने मांडली.
निधीबाबत पाठपुरावा
सध्या निधीची कमतरता आहे, काही आस्थापनांकडून निधी येणे बाकी आहे. त्यामुळे कामगारांची निवृत्तीची रक्कम मिळाली नाही. संबंधित आस्थापनांकडील निधी मिळावा म्हणून पाठपुरावा केला जात आहे. तो निधी मिळाला की कामगारांची निवृत्तीची रक्कम मिळेल, असे राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.