Join us

गिरणी कामगारांचे घरांचे स्वप्न सत्यात उतरणार? कागदपत्रांसाठी ऑनलाइन सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 1:50 PM

Mumbai Mill workers: म्हाडाकडून बंद ५८ गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले नाहीत अशा एकूण १ लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्यासाठी अभियानाचे आयोजन १४ सप्टेंबरपासून वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात करण्यात आले आहे.

मुंबई - म्हाडाकडून बंद ५८ गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले नाहीत अशा एकूण १ लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्यासाठी अभियानाचे आयोजन १४ सप्टेंबरपासून वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात करण्यात आले आहे. गिरणी कामगार, वारसांना पात्रता निश्चितीकरिता कागदपत्रे सादर करण्यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध आहे.

ॲप मदत करणारगिरणी कामगार, वारसांच्या पात्रतेकरिता स्वतंत्र ॲप विकसित केले आहे. हे ॲप अर्जदार भ्रमणध्वनीवर डाउनलोड करू शकतील. ॲण्ड्रोइड व्हर्जनच्या मोबाइलमध्ये गुगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोअरमध्ये मिल वर्कर इलिजिबलीटी या नावाने आहे. या माध्यमातून अर्जदार कधीही आणि कुठूनही कागदपत्रे संगणकीय प्रणालीत सादर करू शकतील. 

कागदपत्रे कोणती? पात्रता निश्चितीकरिता १३ पैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वसाक्षांकीत छायांकित प्रत सादर करावी. गिरणी कामगारांचे ओळखपत्र, तिकीट नंबरची प्रत, सर्व्हिस प्रमाणपत्र, लाल पास, प्रॉव्हिडंट फंड क्रमांक, इ एस आय सी   क्रमांक, मिल प्रमाणपत्र प्रत, हजेरी पत्र, लिव्ह रजिस्टर प्रत, उपदान प्रदान आदेश, भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, पगार पावती यापैकी उपलब्ध कागदपत्र सादर करावीत. आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे. 

अडचण आली तर काय ?ॲप वापरताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण आणि मार्गदर्शन करण्यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यात येणार आहे. ९७१११९४१९१ या मोबाइल क्रमांकावरही माहिती मिळणार आहे.  

कुठे अभियानगिरणी कामगार पात्रता निश्चितीचे विशेष अभियान वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील पहिला मजला, कक्ष क्रमांक २४०, पणन कक्ष येथे आयोजित करण्यात येत आहे.

कागदपत्रे अपलोड कुठे करायची ?म्हाडा मुख्यालयात येऊन प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करण्याव्यतिरिक्त, www.millworkereligibility.mhada.gov.com वर  कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा आहे.

सादरीकरणॲपची माहिती देण्याकरिता संघटनेच्या प्रतिंनिधींकरिता सादरीकरणाचे करण्यात आले. मोहिमेदरम्यान जमा झालेली कागदपत्रे कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पात्रतेकरिता पाठविण्यात येणार आहेत.

टॅग्स :मुंबई