पनवेलमधील घरांत १५ दिवसांत गिरणी कामगारांचा प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 12:23 AM2018-10-12T00:23:12+5:302018-10-12T00:23:30+5:30
म्हाडाने गिरणी कामगारांसाठी सुरू केलेल्या ४ दिवसीय पात्रता निश्चिती शिबिराला गिरणी कामगारांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गिरणी कामगारांच्या रखडलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
मुंबई : म्हाडाने गिरणी कामगारांसाठी सुरू केलेल्या ४ दिवसीय पात्रता निश्चिती शिबिराला गिरणी कामगारांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गिरणी कामगारांच्या रखडलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे रखडलेल्या गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीवर योग्य तो तोडगा म्हाडाने काढल्यामुळे पनवेलमधील मौजे-कोन येथील एमएमआरडीएच्या घरांसाठी विजेते ठरलेले गिरणी कामगार आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर येत्या १५ दिवसांत नवीन घरात प्रवेश करू शकतील, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे.
म्हाडाच्या विशेष शिबिराला मौजे-कोन येथील विजेत्या गिरणी कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोमवारी पहिल्या दिवशी ३५, मंगळवारी ४०, बुधवारी ४५ तर गुरुवारी शेवटच्या दिवशी ३५ विजेत्या गिरणी कामगारांनी घरांसाठीची पात्रता निश्चिती प्रकिया पूर्ण केली. मधल्या काळात गिरणी कामगारांच्या घरासाठी म्हाडाकडून पात्रता निश्चिती सुरू करण्यात आली होती. मात्र अर्जातील त्रुटींमुळे ती बारगळली होती. मात्र म्हाडाने या विशेष शिबिरात अर्जातील जाचक अटी दूर केल्यामुळे गिरणी कामगारांना आवश्यक कागदपत्रांसह पात्रता निश्चितीत सहभागी होता आले.
म्हाडाचे उपमुख्य अधिकारी टी.पी. राठोड यांनी सांगितले की, या शिबिरामुळे गिरणी कामगारांना घर मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला. कागदपत्रांची आणि पात्रता निश्चितीची प्रकिया पूर्ण केली आहे. पनवेलमधील मौजे-कोनमधील घरांची ठरवून दिलेली रक्कम आता या विजेत्या गिरणी कामगारांनी भरण्यासही सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांमध्ये आवश्यक प्रकिया पूर्ण करून हे गिरणी कामगार आपल्या हक्काच्या घरांमध्ये प्रवेश करतील, असेही राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.