Join us  

गिरणी कामगार सदनिका सोडत! प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी २१, २२ डिसेंबरला विशेष शिबिर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 2:14 PM

Mumbai News : मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगारांसाठी काढलेल्या उपरोक्त नमूद सोडतींमधील यशस्वी अर्जदारांना गाळा वितरणाचे प्रथम सूचना पत्र पाठवण्यात आले आहेत.

मुंबई - म्हाडाच्यामुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे गिरणी कामगारांसाठी २८ जून २०१२, ९ मे २०१६ व २ डिसेंबर २०१६ रोजी काढण्यात आलेल्या सोडतींमधील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे २१ व २२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगारांसाठी काढलेल्या उपरोक्त नमूद सोडतींमधील यशस्वी अर्जदारांना गाळा वितरणाचे प्रथम सूचना पत्र पाठवण्यात आले आहेत. त्यानुसार गिरणी कामगार/वारस यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र / अपात्रतेच्या निर्णयासाठी सदरच्या मूळ नस्ती प्राधिकृत/ अपील अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत. बहुतांश गिरणी कामगार /वारस यांनी सादर केलेली कागदपत्रे ही अपूर्ण असल्याने संबंधित प्राधिकृत अधिकारी / अपील अधिकारी यांनी संबंधित यशस्वी अर्जदारांना आवश्यक असणारी कागदपत्रे सादर करण्याबाबत वेळोवेळी कळविले आहे तसेच स्मरण पत्र सुद्धा पाठविली आहेत. मात्र, आवश्यक असणारी कागदपत्रे सादर न केल्याने संबंधित यशस्वी अर्जदारांच्या पात्र/अपात्रतेबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे उपरोक्त सोडतींमधील प्राधिकृत/अपिल अधिकारी यांच्याकडे प्रलंबित असणारी प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

उपरोक्त सोडतींमधील ज्या यशस्वी गिरणी कामगार/वारस यांची पात्रता निश्‍चिती कागदपत्र सादर न केल्यामुळे झालेली नाही, अशा गिरणी कामगार /वारसांची यादी म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर यादीमध्ये नमूद यशस्वी गिरणी कामगारांनी या विशेष शिबिरात आवश्यक कागदपत्रे व ओळखपत्रासह सहभागी होण्याचे आवाहन मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे. कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर शासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन या शिबिरात केले जाणार आहे, याची दखल शिबिरास उपस्थित राहणाऱ्या यशस्वी गिरणी कामगारांनी घ्यावी, असे आवाहन डॉ. म्हसे यांनी केले आहे. 

टॅग्स :म्हाडामुंबई