‘गिरणी कामगारांनो म्हाडाचे अर्ज भरा!’
By Admin | Published: May 26, 2017 12:48 AM2017-05-26T00:48:31+5:302017-05-26T00:48:31+5:30
म्हाडातर्फे गिरणी कामगार आणि वारसांना घरांसाठी अर्ज करण्याची आणखी संधी प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : म्हाडातर्फे गिरणी कामगार आणि वारसांना घरांसाठी अर्ज करण्याची आणखी संधी प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. तरी २६ मेपासून अधिकाधिक गिरणी कामगार आणि वारसांनी आॅनलाइन अर्ज करण्याचे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केले आहे.
संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले की, उशिरा का होईना, प्रशासनाला जाग आली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून या निर्णयाची संघ वाट पाहत होता. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर म्हाडाने चांगला निर्णय घेतलेला आहे. तरी याआधी नोंदणीपासून वंचित राहिलेल्या गिरणी कामगार आणि वारसांनी अर्ज करावेत. आवश्यकता भासल्यास त्यांनी तत्काळ राष्ट्रीय मिल मजदूर संघाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
२७ जूनपर्यंत म्हाडाचे आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत असल्याची माहिती संघाचे प्रसिद्धिप्रमुख काशिनाथ माटल यांनी दिली. माटल म्हणाले की, ज्या कामगारांनी व त्यांच्या वारसांनी आधी अर्ज भरले आहेत, त्यांनी पुन्हा अर्ज भरू नयेत. अर्जाची पात्रता पूर्ण करण्यासाठी पाचपैक ी एक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यात मूळ तिकीट क्रमांक व पी.एफ. क्रमांक., ई.एस.आय. क्रमांक, गिरणी व्यवस्थापनाचे प्रमाणपत्र, लाल पास या पुराव्यांचा समावेश आहे. १ जानेवारी १९८२ रोजी गिरणीच्या सेवेत असलेले व गिरण्या बंद झाल्यामुळे नोकरी गमावलेले आणि नियमित आस्थापनेवर गिरणी कामगार म्हणून सेवेत असलेल्या कामगारांनी अर्ज करावेत, असे आवाहन माटल यांनी केले आहे.