Join us

गिरणी कामगारांना फक्त ५० टक्केच पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:06 AM

मुंबई : लॉकडाऊनमुळे बंद असलेले महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे सुरू झाले; परंतु एन.टी.सी.च्या मुंबईतील टाटा, पोदार, इंडिया युनायटेड क्रमांक ५, ...

मुंबई : लॉकडाऊनमुळे बंद असलेले महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे सुरू झाले; परंतु एन.टी.सी.च्या मुंबईतील टाटा, पोदार, इंडिया युनायटेड क्रमांक ५, दिग्विजय तसेच मुंबईबाहेरील बार्शी, अचलपूर या सहा गिरण्या अद्याप बंद आहेत. अधिकाऱ्यांना पूर्ण वेतन तर कर्मचाऱ्यांना अर्धे वेतन दिले जात आहे. त्यावर कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोनामुळे मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे मार्च २०२० पासून गिरणी कामगारांना निवृत्तीवेतनाची रक्कम मिळाली नाही. निवृत्तीवेतनानुसार नियोजन केले जाते. सोसायटीचे कर्ज फेडणे, मुलांचे लग्न, घर बांधणीचे काम केले जाते. मात्र, वर्षभर ही रक्कम न मिळाल्याने जे कर्ज घेतले होते त्याचे व्याज भरावे लागत असल्याचा सवाल कर्मचारी विचारत आहेत.

लॉकडाऊनमध्ये कर्मचारी आणि अधिकारी घरी होते. मात्र, अधिकाऱ्यांना पूर्ण वेतन तर कर्मचाऱ्यांना अर्धे वेतन दिले जाते. निर्बंध शिथिल केल्यानंतर गिरण्या बंदच आहेत. अधिकाऱ्यांना नियमित बोलवण्यात आल्याने त्यांना पूर्ण पगार मिळतो. कर्मचाऱ्यांना काही महिने कामावर बोलविण्यात आले होते. तेव्हा महिनाभराचा पगार दिला. अन्यथा पहिल्या लॉकडाऊन पासून ५० टक्केच पगार मिळत असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

वेतनानुसार घरखर्च, गृहकर्ज, मुलांचे शिक्षण आदी गोष्टींचे नियोजन केले जाते; पण अर्धा पगार मिळत असल्याने घर चालवताना, कर्ज फेडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पगार तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी गिरणी कामगारांनी केली आहे.

चौकट

निधीची कमतरता

सध्या निधीची कमतरता आहे. त्यामुळे कामगारांना अर्धा पगार मिळत आहे. केंद्र सरकारने निधी दिल्यानंतर कामगारांना पूर्ण पगार दिला जाईल. तर अधिकाऱ्यांना पूर्ण पगार मिळत आहे; पण वेळेत मिळत नाही. ऑगस्ट महिन्याचा पगार अद्यापही मिळाला नसल्याचे राष्ट्रीय वस्त्रोउद्योग महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.