मुंबई : व्यवसायासाठी ३६ लाख रुपये दिल्याची खोटी कागदपत्रे बनवून घोडपदेवमधील ६० वर्षांच्या गिरणी कामगाराचे घर भाडेकरूनेच बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गिरणी कामगाराच्या तक्रारीवरून भायखळा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.मूळचे तेलंगणचे रहिवासी असलेले लक्ष्मण मंडाला हे ‘मुंबई टेक्सटाईल’ गिरणीत नोकरीस होते. २००३ पासून गिरणी बंद पडल्याने ते गावी निघून गेले. शासनाने भायखळ्यातील घोडपदेव येथे म्हाडातर्फे बांधलेल्या ‘न्यू हिंद मिल म्हाडा संकुला’त त्यांना २०१४ साली घर मिळाले.तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी हे घर दीपक कदम यांना भाडेकरारावर दिले. त्यानंतर त्यांच्या ओळखीतून तेजस घाडीगावकर याला १ वर्षाच्या कालावधीसाठी घर दिले. मात्र, त्याने पुढे तो करार आणखीन काही दिवस वाढविला. ३१ डिसेंबर २०१७ रोजी त्याचा करार संपल्याने त्याला घर खाली करण्यास सांगितले. मात्र, घाडीगावकरने नकार दिला. त्याने परस्पर खोटी कागदपत्रे बनवून मंडाला यांनी व्यवसायासाठी आपल्याकडून ३६ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे भासवले. ते पैसे फेडले नाही म्हणून घर आपल्या नावावर झाल्याची कागदपत्रे बनवून घेतली. ही बाब मंडाला यांना समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी मुंबई गाठली. याबाबत त्याच्याकडे जाब विचारला, तर त्याने मंडाला यांनाच घराबाहेर काढले.मंडाला यांनी अखेर भायखळा पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. मंडालांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घाडीगावकरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.
भाडेकरूने बळकावले गिरणी कामगाराचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 2:19 AM