Join us

दसऱ्याला घराची किल्ली! गिरणी कामगारांना खूशखबर; अर्ज छाननी ३ महिन्यांत होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 6:12 AM

मुंबईत टेक्सटाईल मिल म्युझियमचे काम तातडीने सुरू करावे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करावी. रांजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करून दसऱ्यापर्यंत चावी हातात देता येईल यादृष्टीने नियोजन करावे,  असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला लोकप्रतिनिधी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि गिरणी कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न आम्ही मार्गी लावत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, गिरणी कामगारांना, त्यांच्या वारसांना हक्काची घरे मिळाली पाहिजेत ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. त्यासाठी कार्यवाहीला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे १ लाख ७४ हजार अर्ज म्हाडाकडे आले आहेत. त्याची छाननी तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पात्र- अपात्र संख्या निश्चित होऊ शकेल.

  • मुंबईत टेक्सटाईल मिल म्युझियमचे काम तातडीने सुरू करावे, अशा सूचना मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना  देण्यात आल्या. या ठिकाणी गिरणी कामगारांच्या मुला-मुलींना काम देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
  • कल्याण तालुक्यात सुमारे २१ हेक्टर जागा उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून, त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना दिल्या.
  • प्रधानमंत्री आवास योजनेतून गिरणी कामगारांना घरे देण्याच्या विकल्पाबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, सातारा येथील मूळ रहिवासी असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांबाबत त्यांच्या इच्छेनुसार मुंबईबाहेर घरे देण्याबाबतही चर्चा 
  • करण्यात आली.
टॅग्स :मुंबईसुंदर गृहनियोजन