गिरणी कामगारांना मालमत्ता कराची रक्कम मिळणार
By admin | Published: March 25, 2016 02:38 AM2016-03-25T02:38:13+5:302016-03-25T02:38:13+5:30
गिरणी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतींसाठी पालिकेकडून आकारण्यात येणारा मालमत्ता कर व सेवाशुल्क भांडवली मूल्याधारित करप्रणालीवर अवलंबून
मुंबई : गिरणी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतींसाठी पालिकेकडून आकारण्यात
येणारा मालमत्ता कर व सेवाशुल्क भांडवली मूल्याधारित करप्रणालीवर अवलंबून आहे. ज्या ठिकाणी मालमत्ता कराची अतिरिक्त रक्कम घेण्यात आली असेल ती परत करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले.
गिरण्यांच्या जागेवर उभारण्यात आलेल्या इमारतींत ज्या कामगारांना सदनिका देण्यात आल्या तिथे राहणाऱ्या रहिवाशांकडून महिना ३,५४० रुपये वसूल करण्यात येतात. प्रभादेवी येथे स्टॅण्डर्ड मिलच्या जागेवर उभारण्यात आलेल्या इमारतीतील जे गाळे संक्रमण शिबिरासाठी देण्यात आले; त्याच्या मालमत्ता कर व देखभालीचा बोजाही गिरणी कामगारांवर टाकण्यात येत असल्याबाबत किरण पावसकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना गिरणी कामगारांच्या योजनेतील सदनिकेपोटी वसूल करण्यात येणारे सेवाशुल्क, म्हाडाकडून विविध बाबींवर
होणारा खर्च व मालमत्ता कराची देयके यांचे तुलनात्मक विवरणपत्र
तयार करण्यात येत आहे. त्यानंतर फरकाची रक्कम परत केली
जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)