मुंबई : कोरोना रुग्णांवरील उपचार खर्चाची दहशत कमी करण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक घटकाला विमा कवच मिळावे या उद्देशाने सुरू केलेल्या कोरोना कवच या पाँलिसीला उदंड प्रतिसाद मिळत आहे. ही पाँलिसी जाहीर झाल्यानंतर पहिल्या महिन्यांत दररोज सरासरी २२,५०० जण पाँलिसी काढत होते. मात्र, गेल्या महिन्याभरात प्रमाणत दहा पटीने वाढले असून या पाँलिसींची संख्या १ कोटी १० लाखांवर गेल्याची माहिती हाती आली आहे. विमा पाँलिसींच्या विक्रीचा हा एक विक्रम असल्याचे सांगितले जात आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला विमा कवच मिळावे या उद्देशाने विशेष पाँलिसी उपलब्ध करून देण्याचे आदेश इश्न्युरन्स रेग्युलेटरी अथाँरीटी आँफ इंडियाने (आयआरडीएआय) यांनी दिले होते. त्यानंतर १० जुलैपासून विमा कंपन्यांनी ही पाँलिसी बाजारात आणली आहे. विम्याची मुदत, विमाधारकाचे वय आणि विमा कव्हरनुसार ४५० ते ५ हजार ६०० रुपयांपर्यंतचा प्रिमियम भरून ही पॉलिसी घेता येते. साडे तीन, साडे सहा आणि साडे नऊ या तीन प्रकारच्या अल्प मुदतीच्या पॉलिसीतून ५० हजार ते पाच लाखांपर्यंतचे कव्हर विमाधाकरांना मिळते. अनेक पाँलिसी धारकांची साडे तीन महिन्यांची मुदत लवकरच संपत असून कोरोनाचे संक्रमण आणखी काही काळ आटोक्यात येणे शक्य दिसत नाही. त्यामुळे या पाँलिसीला मुदतवाढ देण्याचा निर्णयही आयआरडीएआयने घेतला आहे.