Join us

अंगावर किडा पडल्याचे सांगून व्यापाऱ्याकडील लाखोंचे हिरे पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:07 AM

पाच जणांना अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंगावर किडा पडल्याचे सांगत, व्यापाऱ्याचे लाखो रुपये किमतीचे हिरे लंपास करणाऱ्या ...

पाच जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अंगावर किडा पडल्याचे सांगत, व्यापाऱ्याचे लाखो रुपये किमतीचे हिरे लंपास करणाऱ्या टोळीतील ५ जणांना मालमत्ता कक्षाने अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून २४ लाखांचे हिरे जप्त करण्यात आले असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

अनिल गायकवाड, विशाल गायकवाड, जब्बार शेख, संजय दळवी आणि रफीक अली अशी अटकेतील आरोपींची नावे असून जुन्नर आणि ठाणे येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. बोरिवलीतील हिरे व्यापारी सागर शहा (३८) हे १३ एप्रिलला कामानिमित्त बसने प्रवास करत असताना, आरोपींपैकी एकाने त्यांना अंगावर किडा पडल्याचे सांगून, दुसऱ्याने त्यांच्याकडील हिऱ्यांची बॅग लंपास केली हाेती. याप्रकरणी त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली हाेती. पाेलिसांसह गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षानेही समांतर तपास सुरू केला होता.

मालमत्ता कक्षाचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी किरण बिडवे, ताईतवाले, नागेश पुराणिक, सचिन कदम, अमित भोसले, गादेकर, पाटील, कोयंडे, सावंत, काळे आणि अंमलदारांच्या पथकाने सलग दीड महिना तपास करून या टोळीतील ५ आरोपींना साेमवारी अटक केली. त्यांच्याकडून २४ लाखांचे हिरे जप्त केले.

.........................................................