मुंबई : डॉलरच्या नावाखाली लाखोंचा चुना लावणाऱ्या पश्चिम बंगालमधील टोळीचा डी.बी. मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीचा म्होरक्या असलेल्या सलीम टीकू खान (२८) याला अटक करण्यात आली आहे. मात्र या टोळीचे जाळे सर्वत्र पसरले असून सावध राहण्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. सलीमची १२ जणांची टोळी असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे.शिवाजीनगर परिसरात व्यापारी भरत जैन यांचे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या टॅक्सीचालकांनी त्यांना कमी किमतीत डॉलर मिळत असल्याची माहिती दिली. जैन यांनी खानची भेट घेतली. ठरल्याप्रमाणे खानने २० डॉलर अवघ्या ५०० रुपयांमध्ये देण्याचे आमिष दिले. शिवाजीनगर येथे हा व्यवहार झाला. जैन याने खानच्या टोळीला २ लाख रुपये दिले. डॉलर घेऊन टॅक्सीतून परतताना डॉलरऐवजी कागदाचे बंडल मिळाल्याचे जैन यांच्या लक्षात आले. या प्रकरणी जैन यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून संबंधित टॅक्सीचालकाला अटक करण्यात आली होती.या प्रकरणी पुढील तपास डी.बी. मार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. डी.बी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश हुजबंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन लवांडे यांच्या तपास पथकातील अंमलदार महेश तावडे, शिवाजी काटकर, सलीम जाव्हर, कीर्तिकुमार वऱ्हाडी, संजय बोरसे, सचिन डुबल यांच्या तपास पथकाने अधिक तपास सुरू केला. तपासामध्ये खान टोळीचा प्रताप समोर आला. त्यानुसार लवांडे यांच्या तपास पथकाने सोमवारी सायंकाळी बनावट ग्राहक बनवून खानसोबत संपर्क साधला. ठरल्याप्रमाणे शिवाजीनगर येथे पैसे घेण्यासाठी आलेल्या खानच्या लवांडे यांच्या तपास पथकाने मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)
डॉलरच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा
By admin | Published: April 06, 2016 4:18 AM