लाखो शेतकऱ्यांचा राजधानीत हल्लाबोल; आज घालणार संसद भवनाला घेराव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 05:50 AM2018-11-30T05:50:37+5:302018-11-30T05:50:59+5:30
- विश्वास खोड नवी दिल्ली : शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याच्या संतापातून देशभरातून हजारो शेतकरी गुरुवारी राजधानीतील रामलीला मैदानात डेरेदाखल ...
- विश्वास खोड
नवी दिल्ली : शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याच्या संतापातून देशभरातून हजारो शेतकरी गुरुवारी राजधानीतील रामलीला मैदानात डेरेदाखल झाले.
सरकार शेतकऱ्यांचे हित पाहत नाही. साखर कारखाने ठरल्याप्रमाणे पैसे देत नाहीत. उत्पादन खर्च वाढला आहे. कृषी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असा त्यांचा आक्रोश आहे. सरकार उलथवून टाकण्याची भाषा ते बोलत आहेत. हे शेतकरी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी संसदेला घेराव घालणार आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, राष्ट्रीय किसान मजदूर संघटना, किसान एकता संघटना, भारतीय किसान युनियन अशा २०८ संघटनांचे सदस्य शेतकरी दिल्लीत दाखल होत आहेत. दिल्लीसाठी महाराष्ट्रातून ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ नावाने ३ रेल्वे आरक्षित केल्या आहेत. किमान २ लाख शेतकरी मोर्चामध्ये सामील होणार आहेत.