कर्जाच्या आमिषाने लाखोंची फसवणूक
By admin | Published: December 4, 2014 01:16 AM2014-12-04T01:16:06+5:302014-12-04T01:16:06+5:30
साईधाम सोसायटी या बोगस संस्थेच्या माध्यमातून प्रायव्हेट लोन मिळवून देण्याबाबतची जाहिरातबाजी करून त्याकरीता गरजवंत नागरिकांकडून रोख रक्कम उकळून
पनवेल : साईधाम सोसायटी या बोगस संस्थेच्या माध्यमातून प्रायव्हेट लोन मिळवून देण्याबाबतची जाहिरातबाजी करून त्याकरीता गरजवंत नागरिकांकडून रोख रक्कम उकळून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीने नवी मुंबईसह मुंबई आणि ठाणे भागातील अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खांदेश्वर आणि कामोठे पोलिसांनी या टोळीविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून सदर संस्था चालवणाऱ्या संचालकांसह दोघाजणांना अटक करण्याची कारवाई केली आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये संस्थेचे संचालक आनंद दिनकर पगारे आणि त्याचा सहकारी गणेश कदम या दोघांचा समावेश असून त्यांच्या इतर साथीदारांमध्ये मनिष पुजारी, राम गायकवाड, जान्हवी लाड आणि कोमल सुर्यवंशी या चार जणांचा समावेश आहे. या टोळीने वर्षभरापूर्वी साईधाम सोसायटी नावाची बनावट संस्था तयार करून सदर संस्थेच कार्यालय नवीन पनवेल सेक्टर १० मधील पनवेल प्लाझा या इमारतीत तर दुसरे कार्यालय कामोठे सेक्टर ३४ मधील साईप्रसाद रेसिडेन्सी इमारतीत उघडले. त्यानंतर या टोळीने प्रायव्हेट लोन मिळवून देण्यासंदर्भात लोकल ट्रेनमध्ये जाहिरातबाजी केली. या जाहिरातबाजीला भूलून ज्या गरजवंतांनी या टोळीशी संपर्क साधला. ज्या-ज्या व्यक्तींनी त्यांच्या संस्थेचे शेअर्स विकत घेतले. त्या व्यक्तींना या टोळीने संस्थेच्या नावाने तयार करण्यात आलेले बनावट प्रमाणपत्रे देखील दिली. अशा पध्दतीने या टोळीने कर्ज घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून १० ते २० हजार रूपये घेतले किंवा त्याहून अधिक रक्कम उकळली. आतापर्यंत १३ व्यक्तींची पोलिस तक्रार केली आहे.(प्रतिनिधी)