ठाणे : राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने बदलापूर, कल्याण आणि दिवा येथे एकाच दिवशी टाकलेल्या छाप्यात गोवा निर्मित्त मद्य व भारतीय मद्याचा साठा तसेच वाहतूकीसाठी वापरण्यात येणारी कार जप्त केली आहे. यात एकाला अटक केली असून मुख्य आरोपीचा शोध सुरु असल्याचे व. नि. रमेश धनशेट्टी यांनी सांगितले.गोवा निर्मित मद्याच्या वाहतुकीविरोधात व गोवा मद्यापासून बनविल्या जाणाऱ्या भारतीय बनावट मद्याच्या कारखान्याविरोधात ठाणे राज्य उत्पादन शुल्क (कोकण विभाग) विभागाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. याचदरम्यान, विभागीय उपायुक्त अ.ना.ओहोळ यांना मिळालेल्या माहितीनुसार १ डिसेंबरला बदलापूर येथील खरवली गाव, कल्याणातील निळजेपाडा आणि ठाण्यामधील दिव्यात कारवाई झाली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आणि सॅन्ट्रो कार असा तीन लाख ३३ हजार ३७२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून सदाशिव भोईर याला अटक केली. तर मुख्य आरोपी वासुदेव चौधरी हा पसार झाला. ही कारवाई दुय्यम निरीक्षक राजेंद्र लब्दे, विनोद जाधव, संतोष शिवापूरकर, मधुकर राठोड, एस.टी.गिते, एस.एल. टोपले, अविनाश पाटील, भाऊसाहेब गडधे आणि वाहनचालक सदानंद जाधव यांनी केली. (प्रतिनिधी)
लाखोंचा गोवा निर्मित मद्यसाठा जप्त
By admin | Published: December 02, 2014 11:05 PM