Join us  

मॅरेथॉनमधून शेतकऱ्यांना लाखोंची मदत

By admin | Published: February 16, 2016 3:02 AM

मालाडमध्ये रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनमध्ये एकूण नऊ लाखांचा निधी उभारण्यात आला आहे. हा सर्व निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून

मुंबई : मालाडमध्ये रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनमध्ये एकूण नऊ लाखांचा निधी उभारण्यात आला आहे. हा सर्व निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्यात आल्याची माहिती या मॅरेथॉनचे आयोजक युवा भारत फाउंडेशनकडून देण्यात आली. भारतीय सैन्यदलाचे धावपटू राकेश कुमार यांनी ही मॅरेथॉन जिंकली.या मॅरेथॉनमध्ये पन्नास विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन या वेळी करण्यात आले. दहा विविध एनजीओ आणि दोन हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग ही या मॅरेथॉनची वैशिष्ट्ये ठरली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय, गृहराज्यमंत्री राम शिंदे, मंत्री विद्या ठाकूर, खा. गोपाळ शेट्टी, आ. योगेश सागर, नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा, जेठालाल फेम कलावंत दिलीप जोशी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डना प्रशिक्षण देणारे ग्रँडमास्टर दीपक शौर्य ऊर्फ शिपूजी यांची प्रमुख उपस्थिती होती. मॅरेथॉनच्या माध्यमातून उभारण्यात आलेला ९ लाखांचा निधी मुख्यमंत्री मदत निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्याचे युवा भारत फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भाजपाचे मुंबई प्रवक्ते योगेश वर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ‘शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडू नये, आम्ही तुमच्या सोबत आहोत’, असा महत्त्वपूर्ण संदेशही या मॅरेथॉनमधून देण्यात आला. (प्रतिनिधी)