दोन नेपाळी सुरक्षारक्षकांना पुण्यातून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहिसरमधील जैन मंदिरातून लाखो रुपयांच्या मूर्तीची चोरी करून पसार झालेल्या दोन सुरक्षारक्षकांना शनिवारी अटक करण्यात आली. दहिसर पोलिसांनी अवघ्या सात तासांत ही कारवाई करून मूर्ती हस्तगत केल्या.
पुरण रुकाये (२८) आणि पदम थापा (३०) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ते दोघे आनंदनगरच्या जैन मंदिर ब्लू बेल बिल्डिंगमध्ये कामाला होते. त्यांनी १८ मार्च, २०२१ रोजी मंदिरातील तीन मूर्ती, सोन्याचांदीचे शिक्के व रोख रक्कम असा मिळून ४ लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास करून पळ काढला. याप्रकरणी कैलास मेहता या सुरक्षारक्षकाने दहिसर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश रोकडे, सहायक पोलीस ओम तोटावर व डॉ. चंद्रकांत घार्गे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तोटावर यांच्या तांत्रिक तपासात ते दोघे पुण्यात पिंपरी-चिंचवडमध्ये लपल्याचे समजले. त्यानुसार तपासाअंती पाेलिसांनी दाेघांना अवघ्या सात तासांत अटक केली.
.......................