दागिन्यांच्या कारखान्यातून लाखोंचे दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 02:42 AM2019-12-26T02:42:43+5:302019-12-26T02:43:32+5:30
तीन कामगारांना अटक : पश्चिम बंगालला पळण्याच्या होते तयारीत
मुंबई : सोन्याचे दागिने घडविण्याच्या कारखान्यातून लाखो रुपयांचे दागिने लंपास करून कामगारांनी पळ काढला. मात्र अवघ्या बारा तासांत बोरीवली पोलिसांनी त्यांचा गाशा गुंडाळला आणि चोरीला गेलेला मुद्देमालही हस्तगत केला. बोरीवलीच्या म्हात्रे चाळीमध्ये दागिने घडविण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात अरिफ उल इस्लाम शेख (४१), मुर्शिद आलम मुकबूल आलम (२१) आणि मफिजूल शेख नूर इस्लाम (३०) हे काम करायचे. यात आलम व इस्लाम हे शेखच्या ओळखीने नुकतेच रुजू झाले होते.
कारखाना मालकाने त्यांच्याकडे जवळपास अडीच लाख रुपये किमतीचे दागिने दिले होते. हे दागिने मालकाची नजर चुकवून त्यांनी लंपास केले आणि पसार झाले. ही बाब मालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी बोरीवली पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल
केली. बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद घाग, पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील, अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार करण्यात आली. तिन्ही आरोपी पश्चिम बंगालचे राहणारे असल्याने ते पुन्हा गावी पळणार असा संशय पोलिसांना होता. त्यानुसार सीएसएमटी, एलटीटी आणि कल्याण या ठिकाणी ही पथके रवाना झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीमध्ये हे रे रोड आणि कल्याण रेल्वेस्थानकाजवळ असल्याचे समजले. त्यानुसार घाग यांच्या पथकाने तिघांच्या मुसक्या आवळल्या.