पेइंग गेस्ट बनत वृद्धेच्या घरात शिरून लाखो लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:05 AM2020-12-25T04:05:57+5:302020-12-25T04:05:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पेइंग गेस्ट बनवून घेण्याची विनंती केली. वृद्धेच्या घरात शिरले. लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पेइंग गेस्ट बनवून घेण्याची विनंती केली. वृद्धेच्या घरात शिरले. लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. जुहूमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मनीषा नामक महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिचा शोध सुरू आहे.
प्रणिती मेहता (७५) यांचे पती जितेंद्र यांचे निधन झाल्यापासून त्या जुहूमधील घरात एकट्याच राहतात. त्या पेइंग गेस्टच्या शोधात होत्या. त्यानुसार मनीषा नामक महिला त्यांच्या घरी येऊन बळजबरीने तिला पेइंग गेस्ट बनवून घेण्यासाठी विनंती करू लागली. त्यावर पोलीस व्हेरिफिकेशनशिवाय तिला परवानगी देण्याचे मेहता यांनी टाळले. तरीदेखील मनीषा त्यांच्यासमोर गयावया करू लागल्याने मेहता यांनी तिला घरात घेत काही वेळ बसायला सांगितले आणि त्या आंघोळीला गेल्या. त्याचा फायदा घेत मनीषाने त्यांच्या घरात शिरत लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करत पळ काढला. ही बाब मेहता यांना समजल्यानंतर त्यांनी नातेवाइकांना कळवत जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी सध्या चौकशी सुरू असून लवकरच आरोपीला गजाआड करण्यात येईल, अशी माहिती जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ यांनी दिली.