लसीकरणाच्या नावाखाली निर्मात्याला लाखोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:06 AM2021-06-21T04:06:07+5:302021-06-21T04:06:07+5:30
कांदिवलीतील प्रकार; शिबिराच्या बहाण्याने उकळले दाेन लाख लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाला प्रतिबंध करणारे लसीकरण करण्याच्या बहाण्याने बनावट ...
कांदिवलीतील प्रकार; शिबिराच्या बहाण्याने उकळले दाेन लाख
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाला प्रतिबंध करणारे लसीकरण करण्याच्या बहाण्याने बनावट लस देणाऱ्या ठकसेन दुकलीने कांदिवलीतच आणखी एक बोगस लसीकरण शिबिर आयाेजित केल्याचे उघडकीस आले आहे. लसीकरण शिबिर घेण्याच्या बहाण्याने त्यांनी एका प्रसिद्ध निर्मात्याकडून दोन लाख रुपये उकळले.
संजय गुप्ता व राजेश पांडे अशी या ठगांची नावे असून, त्यांच्याविरुद्ध निर्माते संजय राऊत राय यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
लसीकरण केंद्राच्या नावाखाली काळाबाजार सुरू असल्याची घटना काही दिवसांपूर्वीच कांदिवलीत उघडकीस आली. दोघांनी इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून हिरानंदानी सोसायटीतील १५१ नागरिकांना कोविशिल्ड लस देण्याच्या नावाखाली भेसळयुक्त द्रव्य दिले होते. लस घेतल्याबद्दल वेगवेगळ्या हॉस्पिटलची बनावट प्रमाणपत्रे दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अशाच प्रकारे कोकिळाबेन रुग्णालयाचा मार्केटिंग प्रमुख असलेल्या राजेश पांडे याने वर्सोव्यातील आदित्य कॉलेजलाही फसविल्याचे समाेर आले आहे. अशा फसवणुकीबद्दल बोरिवली पोलिसांकडेही एक तक्रारही दाखल झाली आहे.
दरम्यान, याच कांदिवलीत अशाच प्रकारे एका निर्मात्याला फसविण्यात आल्याचे समाेर आले आहे. सोसायटीमध्ये लसीकरण कॅम्प लावण्यासाठी ठगांनी राऊत राय यांच्याकडून दोन लाख १२ हजार ४०० रुपये घेतले. कोविशिल्डची लस देत असल्याचे सांगून भेसळयुक्त इंजेक्शन दिली. त्यांना लस दिल्याबाबत नानावटी रुग्णालयाच्या नावे बनावट प्रमाणपत्रे दिली होती. राय यांनी त्याबाबत रुग्णालयातून खातरजमा केली असता ही बाब समोर आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत शर्मा व पांडे यांच्याबद्दल तक्रार दिली. दोघांनी अशा प्रकारे कितीजणांची फसवणूक केली आहे, याचा पोलीस तपास करीत आहेत.
.............................