चॉकलेट विकणाऱ्या ७० वर्षीय आजींचे लाखो चाहते
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 07:44 AM2022-09-20T07:44:56+5:302022-09-20T07:47:03+5:30
वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत खणखणीत आवाज आणि गोड हसऱ्या चेहऱ्याने प्रवासाचा आनंद चॉकलेट खात साजरा करा, असा संदेश त्या देतात.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ५० रुपयांचे चॉकलेट विकणाऱ्या आजींचे लाखो चाहते चर्चगेट ते अंधेरी या पश्चिम रेल्वेवरील मार्गावर, तर कधी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते दादर या मध्य रेल्वेवरील मार्गावर गेल्या काही दिवसांपासून दिसून येतात. या मार्गावर साधारणपणे ७० वर्षीय आजीबाई नियमितपणे चॉकलेटची विक्री करताना दिसतात.
त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत खणखणीत आवाज आणि गोड हसऱ्या चेहऱ्याने प्रवासाचा आनंद चॉकलेट खात साजरा करा, असा संदेश त्या देतात. त्यांच्या या चॉकलेट विक्रीचा व्हिडिओ अलीकडेच एका मुलीने काढला आणि तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पहिल्यांदा टाकला. त्यानंतर अल्पावधीतच तो सर्वच सोशल माध्यमांवर व्हायरल झाला. बघता-बघता आजींच्या या फोटोला आणि काही सेकंदाच्या व्हिडिओला लाखो प्रेक्षक लाभले. आजींची जिद्द आणि चेहऱ्यावरचा आनंद याचे विशेष कौतुक नेटिझन्सने केले आहे. आजींनी आजवर किती चॉकलेट विकली ते माहीत नाही, पण या आजींचे सोशल मीडियावर लाखो फॅन्स झाले आहेत. आता तुमच्या-आमच्या रेल्वे प्रवासात आजी चॉकलेट विकताना दिसल्या, तर एकतरी चॉकलेट घेऊन आपण त्यांना आणखी आनंद देणार ना?