आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना लाखोंचे पॅकेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:16 AM2020-12-03T04:16:00+5:302020-12-03T04:16:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या विविध कंपन्यांकडून पहिल्याच दिवशी भरघोस पॅकेजेस मिळाले आहेत. यावर्षी स्थानिक कंपन्यांकडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या विविध कंपन्यांकडून पहिल्याच दिवशी भरघोस पॅकेजेस मिळाले आहेत. यावर्षी स्थानिक कंपन्यांकडून पहिल्याच दिवशी ४६.४१ लाखांची ऑफर, तर आंतरराष्ट्रीय कंपनीकडून १.५७ लाख युरोची ऑफर मिळाल्याची माहिती आयआयटी मुंबईकडून देण्यात आली. प्री प्लेसमेंट ऑर्समध्येही जास्त पॅकेज मिळवणाऱ्या आणि त्या ऑफर्स मान्य करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याची माहिती मिळाली आहे.
आयआयटी मुंबई प्लेसमेंटच्या सीजनला सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी सर्वात जास्त पॅकेज देणाऱ्या कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्ट, गुगल, टेक्सास इन्स्ट्रूमेंट, क्वॉलकम, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, ॲपल, बेन अँड कंपनी अशा कंपन्यांचा समावेश होता. पहिल्या दिवशी १८ कंपन्यांनी प्लेसमेंट ऑर्समध्ये आपला सहभाग दर्शविला. आतापर्यंत विद्यार्थ्यांकडून १५३ प्री प्लेसमेंट्स ऑफर्स स्वीकारण्यात आल्याची माहिती प्लेसमेंट सेलकडून देण्यात आली आहे.
क्वॉलकमकडून स्थानिक ऑफर्समध्ये सर्वात जास्त म्हणजे ४६.४१ लाखांचे पॅकेज देण्यात आले. त्यानंतर वर्ल्डक्वांटकडून ३९.७० लाखांचे, तर मॉर्गन स्टॅनली ३७.२५ लाखांचे आणि उबेरकडून ३५.३८ लाखांचे पॅकेज विद्यार्थ्यांना देण्यात आले. आंतरराष्ट्रीय ऑफर्समध्ये ऑप्टिव्हर कंपनीकडून दिल्याची माहिती प्लेसमेंट सेलने दिली. रिक्रुटर्स कंपन्यांकडून आयटी, सॉफ्टवेअर, कोअर इंजिनीअरिंग या क्षेत्रातील ऑफर्समध्ये प्राधान्य दिले आहे. अंदाजे ५५० कंपन्यांनी आयआयटीच्या प्लेसमेंटसाठी सहभाग नोंदविला असून पहिल्या दिवशी १८ कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली आहे. पुढील दिवसात आणखी काही कंपन्यांकडून ऑफर्स येणार असल्याचा आयआयटी मुंबई प्लेसमेंट सेलकडून सांगण्यात आले आहे.