डेबिट कार्ड क्लोन करून फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एका ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये जनरल मॅनेजर असलेल्या ४२ वर्षीय व्यक्तीचे डेबिट कार्ड क्लोन करून लुटारूने त्यांच्या बँक खात्यातील १ लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करून सर जे. जे. मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
तक्रारदार हे खांडिया स्ट्रीट परिसरात कुटुंबासोबत राहतात. नागपाडा येथील एका नामांकित बँकेच्या नागपाडा शाखेत त्यांचे बचत खाते असून या खात्याचे डेबिट कार्ड ते दैनंदिन कामासाठी वापरतात. तक्रारदार यांनी ६ मे रोजी या डेबिट कार्डचा वापर करून ग्रँट रोड येथील एका पेट्रोल पंपावर आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरले होते. दरम्यान, त्यांचे कार्ड क्लोन करून ठगाने ८ आणि ९ मे रोजी त्यांच्या बॅंक खात्यातून झालेल्या १० आर्थिक व्यवहारात १ लाख रुपये काढले. याबाबतचे संदेश माेबाइलवर येताच त्यांना धक्का बसला. त्यांनी बँकेत कॉल करून घडलेला प्रकार सांगत खात्यातील व्यवहार बंद करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे गाठून झालेल्या या आर्थिक फसवणुकीची तक्रार दिली आहे.
याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. त्यांच्या कार्डची माहिती नेमकी कुठून चोरी झाली, याबाबत अधिक तपास सुरू आहे.
...................................................