Join us  

स्क्रॅप माल देण्याच्या नावाखाली व्यावसायिकाला लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:08 AM

मुंबई : स्क्रॅप माल देण्याच्या नावाखाली व्यावसायिकाला लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार पायधुनीमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल ...

मुंबई : स्क्रॅप माल देण्याच्या नावाखाली व्यावसायिकाला लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार पायधुनीमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पायधुनी पोलीस तपास करीत आहेत.

नेपीयन्सी रोड परिसरात राहण्यास असलेले तक्रारदार यांचा कर्नाक बंदर येथे स्टील ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये स्टील ब्रोकर शहा याने त्यांच्याकडे एका पार्टीचा स्क्रॅप माल असल्याचे सांगत व्यावसायिकाची भेट घेतली. त्यानुसार व्यावसायिक भावेश ऊर्फ हितेश दिवाण असल्याचे सांगून त्यांच्याशी मोबाइलवर बोलणे करून दिले. माल न आवडल्याने व्यावसायिकाने शहा याला दुसरा माल दाखविण्यास सांगितले.

त्यानुसार दुसरा माल दाखवला. माल आवडल्याने त्यांनी व्यवहार ठरवला. दिवाण याने शहा यांना मालासाठी लोडिंग करण्यात येणारा ट्रकचा नंबर आणि मालाचे फोटो पाठवत मालाने भरलेल्या गाडीचे वजन १७.२३० मेट्रिक टन असल्याचे सांगून आगाऊ रकमेची मागणी केली. त्यानुसार, त्यांनी सव्वा दोन लाख रुपये दिले.

मात्र पैसे देऊनही त्यांनी माल न मिळाल्याने त्यांना संशय आला. त्यांनी पैसे परत देण्यासाठी तगादा लावताच दिवान नॉट रिचेबल झाला. अखेर यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पायधुनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.