शासकीय परिवहन पतसंस्थेत लाखोंचा घोटाळा; १७ माजी संचालकांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 02:24 AM2019-03-25T02:24:29+5:302019-03-25T02:24:38+5:30
वरळी येथील शासकीय परिवहन सेवा कर्मचारी सहकारी पतसंस्थेत गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेला घोटाळा उघडकीस आला आहे.
मुंबई : वरळी येथील शासकीय परिवहन सेवा कर्मचारी सहकारी पतसंस्थेत गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेला घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी १७ माजी संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या ६ वर्षांत या संचालकांनी सभासदांच्या ४५ लाखांच्या रकमेवर डल्ला मारला. या प्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोचखानवाला रोड परिसरात ही पतसंस्था असून, २००८ ते २०१३ दरम्यान हा घोटाळा करण्यात आला. या १७ संचालकांनी संस्थेत सभासदांनी विश्वासाने जमा केलेल्या ठेवीमध्ये अपहार केला, तसेच संस्थेच्या ताळेबंद व याद्यांमध्ये फरक दाखवून तब्बल ४५ लाख २० हजार ४२३ रुपयांची फसवणूक केली. हा घोटाळा उघडकीस येताच, पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी वरळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार, पतसंस्थेचे मिलिंद श्रीकांत काकडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नुकताच फसवणुकीचा गुन्हा
दाखल केला आहे. श्रीकांत नाईक, श्रीराम देव, बाबू मगरू, सुधाकर लोखंडे, तुकाराम पाटेकर, दीपक फातकर, बंडोपत चौघुले, बंधाजी परब, आशा म्हसकर, चंद्रकांत राऊत, बजरंग किरदत्त, विजय पतयाण, अशोक गमर, प्रमोद सोनार, मच्छिंद्र सांगळे, श्रीकृष्ण परब, शुभांगी नार्वेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अद्याप अटक नाही!
या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे यांनी दिली.