जुहूतील प्रकार : अल्पवयीन मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घरफाेडीत चाेरलेला लाखोंचा ऐवज मॅनहोलमध्ये लपविणाऱ्या अल्पवयीन चोराला जुहू पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. त्याच्यावर यापूर्वीही असे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
जुहूच्या नेहरूनगरमध्ये राहणाऱ्या पूजा देवेंद्र या कुटुंबासोबत महाबळेश्वरला गेल्या होत्या. त्या ५ फेब्रुवारी, २०२१ला परतल्या, तेव्हा त्यांच्या घरात चोरी झाली हाेती. जवळपास २१ लाखांचा ऐवज पळविण्यात आला हाेता. त्यांनी या प्रकरणी जुहू पोलिसात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हिरालाल बिराडकर यांच्या पथकाने तपास सुरू केला. ज्यात नेहरूनगरमध्ये बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या एका मुलाने अचानक मित्रांना मोठी पार्टी दिल्याची ‘टीप’ त्यांना मिळाली. चाैकशीअंती पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली. मात्र, त्याच्या घरी काही सापडले नाही. पोलिसांकडून करण्यात आलेल्या कसून चौकशीदरम्यान त्याने मॅनहोलमध्ये चाेरीचा ऐवज लपविल्याची कबुली दिली. घरचे विचारणा करतील, म्हणून त्याने ही शक्कल लढविल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्याकडून चोरीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
............................